अमेरिकेची ध्रुवी पटेल ठरली मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024; बॉलिवूड अभिनेत्री होण्याचं स्वप्न

अमेरिकेची ध्रुवी पटेल ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024’ची विजेती ठरली आहे. ती कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टीमची विद्यार्थिनी असून भविष्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री आणि युनिसेफमध्ये राजदूत बनण्याचे तिचे स्वप्न आहे.

मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024 ही हिंदुस्थानाबाहेर आयोजित केली जाणारी एक स्पर्धा आहे. यंदा ही स्पर्धा न्यू जर्सीतील एडिसन येथे पार पडली. यात ध्रुवी पटेल या अमेरिकेतील कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टीम्सच्या विद्यार्थिनीने ताज जिंकला आहे. यानंतर तिने आनंद व्यक्त करत बॉलिवूड अभिनेत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

मिस इंडिया वर्ल्डवाइडचा ताज जिंकल्यानंतर ध्रुवी पटेल म्हणाली की, हा किताब जिंकणे माझ्यासाठी एक अभूतपूर्व सन्मान आहे. हा फक्त एक मुकूट नसून त्याहून अधिक त्याचे महत्त्व आहे. यामुळे माझा वारसा, माझी मूल्ये आणि जागतिक स्तरावर इतरांना प्रोत्साहित करण्याची संधी मिळेल.

दरम्यान, या स्पर्धेमध्ये सुरीनामची लिसा अब्दोएहलकही पहिली उपविजेती, तर नेदरलँडची मालविका शर्मा दुसरी उपविजेती ठरली. मिसेस कॅटेगरीमध्ये त्रिनिदाद अँड टोबॅगोच्या सुएने माउटेट हिने बाजी मारली, तर स्नेहा नांबियार ही फर्स्ट, तर युनायटेड किंगडमची पवनदीप कौर ही सेकंड रनरअप ठरली.

ग्वाडेलूपच्या सिएरा सुरेटोला हिने किशोर गटामध्ये मिस टीन इंडिया वर्ल्डवाइड किताबावर नाव कोरले, तर नेदरलँडची श्रेया सिंग आणि सुरीनाची श्रद्धआ टेडजो अनुक्रमे फर्स्ट आणि सेकंड रनरअप ठरल्या.