‘धर्मवीर’मध्ये दिघंच्या मृत्यूवेळी सोबत मिंधे दाखवले, मृत्यूबाबत शिरसाटांचा रोख कोणाकडे? केदार दिघे यांचा हल्लाबोल

धर्मवीर आनंद दिघे यांना मारले गेले असा आरोप मिंधे गटाचे आमदार संजय शिरसाट हे करत सुटले आहेत, पण शिरसाट यांचे गद्दार नेते एकनाथ शिंदे हे शेवटच्या क्षणी धर्मवीरांच्या मृत्यूसमयी तिथे हजर होते असे ‘धर्मवीर’ सिनेमात दाखवले आहे. तेच आनंद दिखेंना खांद्यावरून नेताना दिसतात. मग संजय शिरसाट यांचा रोख नेमका कोणाकडे आहे? शिरसाट यांना मंत्रीपद न देता त्यांची महामंडळावर बोळवण केली म्हणून मिंधेंविरोधात हा संताप आहे काय, असा जोरदार हल्ला आनंद दिघे यांचे पुतणे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी चढवला.

शिवसेनाप्रमुखांनी सर्व संमतीने उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदी नियुक्ती केली होती. त्यावर मिंधे धर्मवीरांच्या काल्पनिक पात्रासमोर काही प्रश्न पात्राच्या आडून मिंधे हे शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वाला चॅलेंज करत आहेत का? निर्माण करणारे मिंधे गटाचे नेते नीच राजकारण करत आहेत. गेली २२ वर्षे सत्तेची सर्व पदे उपभोगताना यांना आपल्या गुरूच्या मृत्यूबद्दल कोणतीही शंका आली नाही. त्यावेळी ते सत्तेचा मलिदा लाटत होते आणि आता लोकांमध्ये गद्दार मिंधे गटाबद्दल प्रचंड नाराजी असल्याने गद्दारीचे पाप झाकून स्वतःला हिरो दाखवण्यासाठी हे मिंधे गट अत्यंत नीच पातळीवर जाऊन आरोप करीत आहेत. एकीकडे शिवसेनाप्रमुखांना दैवत मानायचे आणि दुसरीकडे आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत राजकारणासाठी संशय निर्माण करायचा. इतकं गलिच्छ राजकारण स्वतःला शिवसैनिक म्हणवणारे हे गद्दार करीत आहेत असा संताप केदार दिघे यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीत मिंधे गटाचा ‘कार्यक्रम’ जनताच करेल हे समोर येऊ लागल्याने मिंध्यांचे नेते आणि पदाधिकारी तोंडाला येईल ते बरळत असल्याचेही ते म्हणाले.

धर्मवीर आमच्या स्वप्नात येऊन सांगतात मिंधे गटाला नेस्तनाबूत करा !
केलेली गद्दारी लपवण्यासाठी मिंधे प्रतिमा उजळण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. स्वप्नात आनंद दिघे येतात असे काल्पनिक चित्र रंगवून गद्दारीचे पाप लपवण्यासाठीच ‘धर्मवीर २’ सिनेमा काढला आहे. आनंद दिघे स्वप्नात येऊन शिवसेना पक्ष चोर असे कधीच सांगणार नाहीत. त्यामुळे या सिनेमात धर्मवीरांच्या प्रतिमेचा गैरवापर मिंधेंनी केला, त्यांना ठाणेकर कधीच माफ करणार नाहीत असे केदार दिघे यांनी ठणकावले.