आरक्षणासाठी धनगर समाजाचे आजपासून पंढरपुरात आमरण उपोषण, आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही; सरकारला इशारा

स्वातंत्र्यापासून धनगर समाज एसटीच्या आरक्षणासाठी झगडत आहे. सरकारने धनगर समाजाला आरक्षण द्यावे. आता आरक्षणाची अंमलबजावणी केल्याशिवाय माघार नाही, असा इशारा देत धनगर बांधव उद्यापासून (दि. 9) पंढरपूर येथे आमरण उपोषणाला बसणार आहेत, अशी माहिती धनगर समाजाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील दोन कोटी मतदारसंख्या असलेला आदिवासी धनगर समाज समूह आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. धनगर एसटी आरक्षणाची मागणी घेऊन पंढरपूर येथील टिळक स्मारक मंदिर येथे शेकडो धनगर बांधव आमरण उपोषणाला बसत आहेत.

धनगरांच्या मतदानाच्या जिवावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेली साडेसात वर्षे सत्तेत आहेत. त्यांनी लेखी आश्वासन देऊनही आदिवासी धनगरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे जमातीमध्ये राज्यातील सर्वच नेत्यांबद्दल चीड आहे.

सरकार मूळ प्रश्नाला बगल देऊन धनगरांची निराशा करीत आहे. आता आरक्षणाची अंमलबजावणी केल्याशिवाय माघार नाही, हाच उद्देश घेऊन धनगर बांधव उद्यापासून (दि. 9) पंढरपूर येथे आमरण उपोषणाला बसत आहेत.

यावेळी पांडुरंग मेरगळ, ऍड. विजय गोफणे, भीमराव सातपुते, दीपकराव बोऱहाडे, माउली हळनवर, विठ्ठल पाटील, सोमनाथ ढोणे, प्रशांत घोडके, संजय लवटे, प्रसाद कोळेकर, संतोष ठोंबरे, अजय गाढवे, योगेश धरम, दिलीप गाडेकर उपस्थित होते.

धनगर समाज हा स्वातंत्र्यकाळापासून आरक्षणासाठी लढत आहे. सत्तेतील महायुती सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांना विसर पडला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांना धनगर समाजाचा सामना करावा लागेल.

– पांडुरंग मेरगळ, आंदोलक