खोया खोया चांद – दस्तक – दारी पडली थाप कुणाची?

>> धनंजय कुलकर्णी

राजिंदर सिंह बेदी हे नाव हिंदी सिनेमाच्या दुनियेत 1950-60च्या दशकामध्ये खूप मशहूर होतं. उर्दू साहित्यातील ते नामवंत लेखक होते. सिनेमाच्या दुनियेतील ते उत्तम पटकथाकार आणि संवाद लेखक होते. सोहराब मोदी, अमिया पावर्ती, बिमल रॉय. ऋषिकेश मुखर्जी यांच्या अनेक चित्रपटांच्या कथा, पटकथा राजिंदर सिंह बेदी यांच्या होत्या. दिलीपकुमारच्या ‘दाग’, ‘देवदास’, ‘मधुमती’, सोहराब मोदी यांच्या ‘मिर्जा गालिब’, हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘अनुराधा’, ‘अनुपमा’, ‘अभिमान’, ‘सत्यकाम’चे संवाद त्यांनी लिहिले होते. सत्तरच्या दशकात त्यांनी पहिल्यांदा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकले आणि त्यांच्या पहिल्याच चित्रपटावर राष्ट्रीय पुरस्काराची मोहोर उमटली! त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 1970 सालच्या ‘दस्तक’ला सर्वोत्कृष्ट नायक (संजीव कुमार), सर्वोत्कृष्ट नायिका (रेहाना सुलतान) आणि सर्वोत्कृष्ट संगीत (मदन मोहन) असे तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. ‘दस्तक’ हा चित्रपट समांतर सिनेमातील एक माईल स्टोन ठरला. चांगले साहित्यिक मूल्य असणाऱया कथानकावर उत्कृष्ट कलाकृती बनवता येते हे त्यांनी सिद्ध केले. त्या काळात हा सिनेमा फारसा चालला नाही. 1 डिसेंबर 1970 रोजी प्रदर्शित झालेल्या या कृष्णधवल सिनेमाचे कथानक, अभिनय, दिग्दर्शन आणि संगीत जबरदस्त होते. त्यामुळेच कदाचित यातील दु:ख अधिक गहिरे वाटले असणार. हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर अमीट छाप सोडून जातो हे नक्की. आज हा सिनेमा प्रदर्शित होऊन त्रेपन्न वर्षे पूर्ण होत आहेत.

मुंबईमधील जागेचा प्रश्न आणि त्यामुळे एका नवविवाहित दांपत्यापुढे निर्माण झालेले मोठ्ठे संकट फार प्रभावीपणे दिग्दर्शकाने यात दाखवले होते. रेहाना सुलतान हिचा हा पहिलाच चित्रपट होता. याचे कथानक राजेंद्र सिंह बेदी यांनीच 1944 साली लिहिले होते. लाहोरच्या रेडिओवर त्याचे सादरीकरणदेखील झाले होते. त्या कथेचे नाव होते ‘नक्ल- ए – मकानी’ याचाच अर्थ नव्या घरातील प्रवेश. मुंबईमधील जागांचा प्रश्न तेव्हादेखील आजच्या इतकाच तीव्र होता. उत्तर प्रदेशातील एक नवविवाहित मुस्लिम दांपत्य हमीद आणि सलमा (संजीव कुमार आणि रेहाना सुलतान) मुंबईत झोपडपट्टीत राहात असतात. ते आर्थिकदृष्टय़ा गरीब असले तरी इमानदार आणि खानदानी संस्कारी असतात. त्यांचे वैवाहिक जीवन त्या कुबट वातावरणात काही फुलत नाही. म्हणून ते मुंबई सेंट्रलजवळ दोन खोल्या भाडय़ाने घेतात. परंतु त्यांना कल्पना नसते की त्या खोल्यांमध्ये पूर्वी एक तवायफ राहत होती आणि तो सर्व रेड लाइट एरिया आहे. सलमा आणि हमीद आपल्या नव्या संसाराची सुरुवात तिथे करतात. परंतु रोज रात्री त्यांच्या दारावर गिऱहाईके ‘दस्तक’ देत असतात. त्यांना असे वाटत असते की तिथे अजूनही नाच-गाणारी शमशाद बेगम (शकीला बानू भोपाली) राहते आहे. हे दोघेही या त्रासाला खूप वैतागतात. परंतु महागडय़ा मुंबईत त्यांना तिथे राहण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.

हमीद ऑफिसला गेल्यानंतर सलमा एकटीच घरात असते. आजूबाजूच्या मोहल्ल्यातील लोक खिडकीतून आपल्या आंबटशौकीन नजरेने तिला पाहत असतात. सर्वांच्या कामुक आणि घाणेरडय़ा नजरा सलमाला असह्य होत असतात. तिचे पहिलं प्रेम संगीतावर असते. ती तंबोरा घेऊन गाऊ लागते. तिच्या या कृतीने मोहल्ल्यातील लोकांची खात्री पडते की ही ‘गाणारी’च आहे. सलमा आणि हमीदचे वैवाहिक जीवन नरक बनते. अशा समाजात ‘शरीफ’ लोकांचे जिण किती लाचार होऊ शकते याचे प्रत्यंतर इथे येते. त्यांच्या नात्यात कटूता येऊ लागते. ‘हालात से मजबूर’ होऊन ते परिस्थितीला शरण जातात का? मोहल्ल्यातील पुरुषी वासनांधता कोणत्या टोकाला जाते? या तणावात त्या दोघांचा संसार टिकतो का? शेवट काय होतो? दिग्दर्शक राजिंदर सिंह बेदी यांनी नवदांपत्याची भावनिक होरपळ यातून खूप प्रभावीपणे दाखवली आहे. रेहाना सुलतान ही पुण्याच्या एफटीआयची टापर आणि तिचा हा पहिलाच चित्रपट. अप्रतिम अभिनय केला तिने. संजीव कुमारचा तर प्रश्नच नाही. तो कोणत्याही भूमिकेमध्ये फिट असायचा. सिनेमातील प्रमुख पात्रे ही दोनच. पण इतर भूमिकांतील अंजू महेंद्रू, अन्वर हुसैन, मनमोहन कृष्ण, कमल कपूर, शकीला बानू भोपाली यांचादेखील अभिनय सुंदर झाला होता. सिनेमाचा आणखी एक प्लस पॉइंट म्हणजे संगीतकार मदन मोहन यांचे सुमधुर संगीत. लता मंगेशकर यांनी गायलेले चारुकेशी रागावरील ‘बय्या ना धरो रे बलमा…’ हे गाणे एक क्लासिक म्हणून ओळखले जाते. तसेच ‘हम है मता-ए- कुचा बाजार की तरह’ आणि ‘माई रे मै कासे कहू…’ ही मजरूह सुलतानपुरी यांच्या लेखणीतून उतरलेली गाणी अप्रतिम होती. संगीतकार मदन मोहन म्हणजे फ्लॉप चित्रपटांचा हिट संगीतकार होता. अप्रतिम संगीत देऊनही त्याच्या सिनेमाला कधीच पुरस्कार मिळाले नाहीत. पण ‘दस्तक’ अपवाद ठरला! यासाठी संगीतकार मदन मोहन यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याचे छायाचित्रकार कमल बोस यांना त्या वर्षीचे फिल्मफेअर अवार्ड मिळाले. या चित्रपटाचे एडिटिंग ऋषिकेश मुखर्जी यांनी केले होते. एकूणच प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारा असा हा अप्रतिम ‘दस्तक’ सिनेमा होता!

जाता जाता थोडंसं या सिनेमाच्या दिग्दर्शकाबद्दल : राजिंदर सिंह बेदी यांचा जन्म सियालकोट पाकिस्तान येथे 1 सप्टेंबर 1915 रोजी झाला. त्यांचं बालपण आणि शिक्षण (उर्दू भाषेत) लाहोरला झाले. ते पुरोगामी विचारांचे तरक्की पसंद साहित्यिक होते. सदाहत मंटो यांचे खास दोस्त होते. सुरुवातीला लाहोर आकाशवाणी, नंतर जम्मू आणि स्वातंत्र्यानंतर ते मुंबईत आले. वर उल्लेख केलेल्या चित्रपटाबरोबरच ‘गर्म कोट’ हा त्यांच्या कथानकावरील सिनेमा पन्नासच्या दशकात लक्षणीय ठरला. त्यांच्या ‘एक चादर मैली सी’ या कलाकृतीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यावर गीता बालीला घेऊन 1965 साली त्यांनी चित्रपट काढायचे ठरवले होते, पण गीता बालीचा मृत्यू झाल्याने तो प्रोजेक्ट बारगळला. पुढे ऐंशीच्या दशकात याच कलाकृतीवर याच नावाने एक चित्रपट आला होता. पाकिस्तानातही या कथानकावर चित्रपट आला होता. राजिंदर सिंह बेदी यांना 1972 साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1 नोव्हेंबर 1984 रोजी त्यांचे निधन झाले.

(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)

[email protected]