Devgad News – वेळगिवे धनगरवाडीत दोन एसटी बसची धडक, चालक वाहकासह 15 जखमी

राज्य परिवहन महामंडळ विजयदुर्ग आगाराची विजयदुर्ग-पणजी बस आणि कणकवली-विजयदुर्ग बस यांची विजयदुर्ग तरळा मार्गावरील वेळगिवे धनगरवाडी येथे समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात चालक वाहकासह एकूण 15 प्रवाशांना गंभीर व किरकोळ दुखापत झाली आहे.

सदरची घटना सकाळी 7.45 च्या सुमारास वेळगिवे धनगरवाडी या ठिकाणी घडली. अपघातातील जखमींना कासार्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर यातील 9 जणांना उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.पंकज पाटील यांनी दिली. यावेळी त्यांचे सहकारी डॉ.विद्याधर हनमंते, डॉ.सचिन डोंगरे, डॉ.रेड्डी व सहकाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावून आपत्कालीन पथकाच्या सहाय्याने तातडीने औषधोपचार केले.

या अपघातात शकील शब्बीर शेख (वय 27, विजयदुर्ग), नामदेव काशीराम गोरुले (वय 64, गवाणे), गणेश नामदेव मुळे (वय ३७), प्रमोद नथुराम पाळेकर (वय ४०, विजयदुर्ग), अक्षता सुनील हातगे (वय 20, पाटगाव), असद अंकुश चव्हाण (वय 35, सौंदाळे ), नासिर अहमद पठाण (वय 33, विजयदुर्ग), निलेश गंगाधर इंगोले (वय 32, विजयदुर्ग), पवन प्रभाकर मगर (वय 35, विजयदुर्ग ), धनश्री अंकुश चव्हाण (वय 16, सौंदाळे), स्वाती अंकुश चव्हाण (वय 38, सौंदाळे), मानसी अमोल दुर्गिष्ट (वय 16, सौंदाळे), जयश्री रमाकांत मिठबावकर (वय 55, सौंदाळे) या जखमी अपघातग्रस्तांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती समजतात विभाग नियंत्रक अभिजीत पाटील कणकवली यांचा अभियंता सुजित डोंगरे, आघाडी व्यवस्थापक अजय गायकवाड कणकवली, विवेक जमाले विजयदुर्ग यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस केली.