फडणवीसांच्या लाडक्या मुन्नाचा धंतोली पोलीस ठाण्यावर हल्ला, पोलिसांना बेदम मारहाण!

मिंधे सरकारच्या राजवटीत खून, मारामाऱया, महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या मुन्नाने नागपुरातील धंतोली पोलीस ठाण्यावरच हल्ला चढवत पोलिसांना बेदम मारहाण केली. फडणवीस यांच्या गावात घडलेल्या घटनेने महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचा अक्षरशः मुदडा पडला आहे. त्यानंतरही पोलीस ठाण्यावर हल्ला करणारे हल्लेखोर राजकीय दबामुळे मोकाट फिरत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धंतोली पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली. भाजप नेते ओमप्रकाश ऊर्फ मुन्ना यादव आणि त्यांचा भाऊ बाला यादव हे घरातील भांडणानंतर एकमेकांविरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होते. मुन्ना हे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुन्ना यांची मुले करण आणि अर्जुन यांच्यावर बाला यादव आणि त्याच्या मित्रांनी हल्ला केला. यानंतर करण आणि अर्जुनच्या समर्थकांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. हाणामारीनंतर दोन्ही गट पोलीस ठाण्यात पोहोचले, तिथेही त्यांच्यात वाद सुरू होता. यामध्ये पोलीसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करताच अर्जुन याने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही वेळातच गृहमंत्री फडणवीसांचे खासमखास मुन्ना यादव हेदेखील तेथे पोहोचले आणि त्यांनी पोलिसांशी गैरवर्तन केले. ते एवढय़ावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पोलिसांच्या अंगावर हात उगारला तसेच बघून घेण्याची धमकी दिली. या प्रकरणात धंतोली पोलीस ठाण्यात मुन्ना यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आला आहे.

z 2014 ते 2019 पर्यंत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व गृहमंत्री असताना त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्हय़ाचे आरोप होते. तरीसुद्धा त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. उलट त्याला राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्षपद दिले होते.

मुन्ना यादवला इतके अभय का? – अनिल देशमुख

नागपुरातील भाजपचे नेते मुन्ना यादव यांची गुंडगिरी दिवसेंदिवस वाढतच आहे. पोलीस स्टेशनमध्येच मुन्ना यादव व त्यांचे सहकारी वरिष्ठ पोलिसांच्या अंगावर धावून जातात, त्यांना धमक्या देतात. मुन्ना व त्याचे सहकारी यांनी केलेल्या मारहाणीत 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. तरीही या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल करण्यात येत नाही. मुन्ना यादव व त्याच्या सहकाऱयांना पोलीस कोणाच्या दबावाखाली अभय देत आहेत, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

गुंडगिरीमुळे पोलीस विभागही त्रासला

मुन्ना यादव याच्या गुंडगिरीमुळे पोलीस विभागसुद्धा त्रासला आहे. सामान्य नागरीकांना तो तर धमकावतोच, पण पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी ते अंमलदारांच्या अंगावर हात उगारून त्यांनाही बघून घेण्याची धमकी देतो. असे असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्याला वाचवितात आणि मुन्ना यादव त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी रोखतात, अशी चर्चा दबक्या आवाजात पोलीस विभागात सुरू आहे

– नागपूरमधील धंतोली पोलीस ठाण्यावर हल्ला करणाऱया मुन्ना यादव यांच्याविरुद्ध नागपूर शहरात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुन्ना यादव हा फडणवीस यांच्या जवळचा असून त्याची नागपूर शहरात इतकी दशहत आहे की, त्याच्याविरुद्ध कोणी तक्रार देण्यास पुढे येत नाही.

फक्त धमकीचा गुन्हा दाखल

जेव्हा पोलीस बाला यादवच्या जखमी मुलांना रुग्णालयात घेऊन जात होते, तेव्हा मुन्ना यांनी पुन्हा पोलिसांना गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी मुन्ना आणि त्यांच्या मुलांवर भारतीय न्यायिक संहिता अंतर्गत हल्ला किंवा गुन्हेगारी बळजबरीने सार्वजनिक सेवकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी, शांतता भंग करण्याच्या हेतूने अपमान आणि धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र मुन्ना यादव आणि त्यांची दोन्ही मुले अद्याप मोकाट आहेत. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या एका कारमधून धारदार शस्त्रही जप्त केली आहेत.