रोहा स्थानकात दहा मेल एक्स्प्रेसची रखडपट्टी; प्रवाशांचे प्रचंड हाल

मध्य रेल्वेवर रोज काही ना काही गोंधळ सुरूच आहे. रोहा नागोठणे मार्गावर वारंवार फाटक बंद होण्याच्या घटना घडत असताना रोहा स्थानकात मालगाडीच्या इंजिननेच पाऊण तास रेल रोको केला. इंजिन बिघाडामुळे गणेशभक्तांचा परतीचा प्रवास खडतर झाला. मालगाडी बंद पडल्याने रोहा स्थानकाच्या दोन्ही बाजूला किमान दहा मेल, एक्स्प्रेसची रखडपट्टी झाली. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

रोहा रेल्वे स्थानकातून पनवेल दिशेकडे जाणारी मालगाडी सकाळी अष्टमी फाटक क्रमांक ५७ जवळ बंद पडली. गेटमध्येच मालगाडी बंद पडल्याने अष्टमी नाका ते पडम पेपर मिलपर्यंत प्रचंड वाहतूककोंडी झाली. पाऊण तास गाडी रोहा नागोठणे मार्गावर फाटकामध्ये उभी राहिल्यामुळे दोन्ही बाजूला प्रचंड वाहतूककोंडी झाली. पाऊण तासानंतर बिघाड दुरुस्त झाल्यानंतर मालगाडी मार्गस्थ झाली. ऐन सकाळी ऑफिसला जाण्याच्या वेळेतच ही घटना घडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

तांत्रिक बिघाडाचीचौकशी होणार
रोहा रेल्वे स्थानक प्रबंधक अजयकुमार मीना यांच्याशी संपर्क साधला असता गाडीचे प्रेशर पाईप लिकेज असल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितले. गाडी सुरू करण्याआधी ड्रायव्हर व गार्ड संपूर्ण गाडीची तपासणी करूनच गाडी पुढे काढतात. मात्र तरीही तांत्रिक बिघाड झाल्याने या घटनेची रेल्वेकडून चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उड्डाणपूल अडीच वर्षे रखडला
रोहा नागोठणे मार्गावर रेल्वे फाटकामुळे होत असलेल्या वाहतूककोंडीमुळे रेल्वे प्रशासनाने जानेवारी २०२२ मध्ये इथे उड्डाणपुलाचे काम सुरू केले. रेल्वे उड्डाणपुलाचा ठेकेदार आर. के. मधानी व एमआरआयडीसीचे अधिकारी यांच्या दुर्लक्षितपणामुळे उड्डाणपुलाचे बांधकाम गेल्या अडीच वर्षांपासून पूर्ण झाले नाही. उड्डाणपुलाचे काम कासवगतीने सुरू आहे. रेल्वे उड्डाणपुलाच्या रेंगाळलेल्या कामामुळे नागोठणे, रोहा रस्त्याची वाट लागली आहे. मोठमोठ्या खड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.