तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान, अवघे देहू भक्तिसागरात न्हाऊन गेले

>>  प्रकाश यादव

होय होय वारकरी । पाहे पाहे पंढरी ।।
काय करावी साधने । फळ अवघेची येणे ।।

तुकोबांच्या या अभंगवाणीप्रमाणेपंढरीच्या सावळ्या विठूरायाच्या भेटीची आस लागलेल्या लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने शुक्रवारी देहूतून दुपारी तीनच्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.
विठू माऊली, तुकोबांचा अखंड जयघोष, इंद्रायणीकाठी टाळ-मृदंगाच्या गजरात लाखो वैष्णवांच्या मांदियाळीने अवघे देहू भक्तिरसात न्हाऊन गेले तर ऊन सावल्यांचा खेळामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. पालखीचा पहिला मुक्काम आज देहूतच, इनामदारवाडय़ात असणार आहे. यंदा पालखी सोहळ्याचे 339 वे वर्ष आहे. राज्याच्या कानाकोपऱयातून 380 दिंडय़ा सहभागी झाल्या आहेत.

पालखी सोहळ्याच्या कार्यक्रमांना चौघडय़ाच्या निनादात पहाटेपासूनच सुरुवात झाली. पहाटे साडेचार वाजता काकड आरती झाली. पहाटे पाच वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदीरात संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते हस्ते महापूजा करण्यात आली. संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात भानुदास महाराज मोरे, अजित महाराज मोरे, संजय महाराज मोरे यांच्या हस्ते महाअभिषेक झाला. विठ्ठल-रुक्मिणी मातेची महापूजा करण्यात आली. पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.

इनामदार वाडय़ात सकाळी नऊ वाजता तुकोबांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. सकाळी 10 ते 12 या वेळेत देहूकर महाराजांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर परंपरेनुसार तुकोबांच्या पादुका गंगाम्हसले गावचे म्हसलेकर मंडळी यांच्या हस्ते वाजतगाजत जन्मस्थानापासून देऊळवाडयात आणल्या. यानंतर मंदिरातील अहिल्याबाई होळकर भजनी मंडपात अडीच वाजता प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी तुकोबांच्या पादुकांची विधिवत महापूजा करण्यात आली.

रेशमी कपडय़ाने पादुका पुसून आकर्षक फुलांनी सजविलेल्या चांदीच्या पालखीत ठेवण्यात आल्या. यानंतर चोपदार, छडीदार, चौघडावाले, तुतारीवाले, पालखीचे खांदेकरी यांच्यासह मानाच्या विणेकरांचा हार प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. यादरम्यान प्रस्थान सोहळ्यासाठी महाद्वारातून चोपदारांनी निवडक दिंडय़ा देऊळवाडय़ात सोडल्या. तीनच्या सुमारास मानाच्या खांदेकऱयांसह ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेतली, अन् हरिभक्तांनी एकच गजर केला. टाळ मृंदगाच्या निनादाने परिसर दुमदुमून तर शंख, तुतारी, नगारा यांच्या गजराने मंदिराच्या परिसरात चैतन्य निर्माण झाले. यानंतर हरिभजन, फुगडय़ा, दहीहंडी, खो-खो, गोल फेऱया असे विविध खेळ वारकऱयांनी सादर केले. अब्दागिरी, सजावटीची छत्री, गरुडटक्के, अकलूजकर व बाभूळगावकर यांचे मानाचे अश्व अशा थाटात पालखीची देऊळवाडय़ाला प्रदक्षिणा सुरू झाली.

संसार सोहळा नावडे मनाला ।
लागला टकळा पंढरीचा ।।
होतील संताचिया भेटी ।
सांगू सुखाचिया गोष्टी ।।

या अभंगाप्रमाणे विठ्ठल भेटीची आस वारकऱयांमध्ये उत्साह संचारला होता. भगवंताच्या भेटीसाठी व्याकुळलेल्या लाखो भक्तांच्या संगतीने तुकोबांचा पालखी सोहळा 5 वाजून 10 मिनिटांनी मुख्य देऊळवाडय़ाच्या बाहेर पडली. त्यानंतर इनामदार वाडय़ात पालखी पहिल्या मुक्कामासाठी विसावली.

पालखीच्या छत्रीने लक्ष वेधले

– तुकोबारायांच्या पालखीवरसावली धरण्यासाठी यंदा खास वेलवेटची छत्री तयार करण्यात आली आहे. या छत्रीवर शंख, चक्र, तिलक (गंध), गरूड, हनुमान यांची चित्र हातमाग केली आहे. इतर भागात सुरेख नक्षीकाम, छत्रीसाठी लागणाऱया काडय़ा नैसर्गिक बांबूच्या वापरण्यात आल्या आहेत. छत्रीच्या वर पितळी कळस बसविण्यात आला आहे. ही छत्री भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.

माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आज प्रस्थान

– श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पायी वारीसाठी आळंदी मंदिरातून 29 जून रोजी प्रस्थान होणार आहे. यासाठी आळंदी नगरपरिषदेने भाविकांना सेवा सुविधा देण्यास पंबर कसली आहे. इंद्रायणीकाठ वैष्णवांच्या मंदियाळीने फुलून गेला आहे.