आळंदीत माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान; नामजयघोषात लाखो भाविक आळंदीत

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आळंदी मंदिरातील विना मंडपातून शनिवारी हरीनाम गजरात प्रस्थान होणार आहे. या सोहळयाची अनुभूती घेण्यासाठी सोहळा आपल्या नेत्रात साठवून भक्तिमय उत्साहात आनंद सोहळ्यात पंढरीस जाण्यास श्रींचे वैभवी पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यास राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या दिंड्यांतून पायी वारकरी भाविक आळंदीत दाखल झाले आहे. श्रींचे पालखी सोहळ्यातील श्रींचे अश्व आळंदीत प्रवेशले आहेत. या अश्वांचे परंपरेने आळंदीत स्वागत आणि पूजा करण्यात आली.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक आळंदी नगरीत दाखल झाले असून परंपरेनुसार पालखी सोहळ्यात शेकडो दिंड्या प्रवेशल्या आहेत. श्रींचा वैभवी पालखी रथ सजवण्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आहे. पालखी रथासाठी यावर्षी बैल जोडीची सेवा देण्याचा मान सहादु कुऱ्हाडे यांचे बैलजोडीस मिळाला आहे. आता पर्यंत तीन वेळा बैल जोडी रथास जुंपत चाचणी यशस्वी झाल्याची माहिती देवस्थानचे व्यवस्थापक माउली वीर आणि योगेश कुऱ्हाडे यांनी दिली. मंदिर परिसर आणि मुख्य गाभारा सजावटीचे काम प्रगती पथावर आहे.

पहिल्या बैलजोडीस बाजी व हौशा तर दुसऱ्या बैलजोडीस माऊली आणि वजीर असे नामकरण केले असल्याचे मानकरी सहादु कुऱ्हाडे (वस्ताद), योगेश कुऱ्हाडे यांनी सांगितले. श्रींचे नगर खाण्याचा मान परंपरेने बाळासाहेब दगडू भोसले यांना असून त्यांची हि सेवा अनेक वर्षांपासून पालखी सोहळ्यात रुजू होत आहे. यंदा पहिल्या आठवड्यात राज्याच्या काही भागात पेरणी योग्य पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी झाली आहे. यामुळे दिंडीत सहभागी होण्यास शेतकरी भाविकांची संख्या वाढली आहे. असे श्री बोरमलनाथ प्रासादिक दिंडी क्रमांक २४३ चे प्रमुख सचिन महाराज गुरव यांनी सांगितले.

तुकोबारायांचे पालखी सोहळ्याचे प्रस्थान देहू येथून हरिनाम गजरात झाले आहे. या सोहळ्यासाठी सहभागी होण्यासाठी लाखो भाविक देहू नगरीत दाखल झाले आहेत. वारकऱ्यांसाठी आवश्यकते नुसार सुविधा पुरवण्यासाठी देहू नगरपंचायत आणि आळंदीत आळंदी नगरपरिषद प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयात मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी विशेष लक्ष देऊन नागरी सेवा सुविधा पुरविण्यास कंबर कसली आहे. यासाठी कार्यालयीन अधिकांश शिवशरण, बांधकाम अभियंता साची गायकवाड, संजय गिरमे आदींनी परिश्रम घेतले आहे. सोहळ्यात विविध ठिकाणी भाविकांनी पिण्याचे पाणी, अन्नदान सेवेचा लाभ घेतला.

जगद्गुरु श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा ३३९ व्या पालखी प्रस्थान सोहळ्यास दुपारी दोनला सुरुवात झाली आहे. ‘ज्ञानोबा तुकाराम’चा जयघोष आणि देहुतील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात टाळ मृदुंगाचा गजर झाला. देहू नगरीतील भक्तीरंग गहिरा झाला आहे. सोहळा शुक्रवारी पंढरीकडे जाण्यास प्रस्थान सोहळ्याने हरिनाम गजरात मार्गस्थ झाला.

आळंदीत इंद्रायणी नदीला फेस, भाविकांत नाराजी
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीचे पावित्र्य वाढत्या प्रदूषणाने धोक्यात आले आहे. वारीच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणी स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिक, भाविक नाराजी व्यक्त करीत आहेत. पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करण्याची परंपरा मात्र भाविकांनी जोपासली आहे. परंपरे नुसार इंद्रायणी नदी स्नान आणि नंतर माऊलींचे दर्शन भावी घेत नगरप्रदक्षिणा पूर्ण करतात. गेल्या काही महिन्या पासून अनेक कंपन्यातून येणारे केमिकल युक्त तसेच मैला मिश्रित सांडपाणी थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडले जात असल्याने इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण वाढले जात आहे. परिणामी पाणी दूषित होऊन नदीपात्रात स्नान करणाऱ्या भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शासनास नदी पात्रात स्नान करू नये असे फलक लावण्याची वेळ यामुळे आली. शेतमाल घेणारे शेत जमिनी वर याचा प्रादुर्भाव देखील झाल्याचे शेतकरी भाविक सांगतात. विविध सेवाभावी संस्था प्रतिनिधी आदींचे नदी प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पर्यावरण विभागाने इंद्रायणी आणि पवना नदी प्रदूषण रोखण्यासाठी दोन्ही नद्यांचा डी.पी.आर तयार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जीवित नदी प्रकल्पाच्या प्रमुख अश्विनी देशपांडे, संतोष ललवाणी यांनी सांगितले.