सिंधूची आगेकूच; लक्ष्यला धक्का

डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या सलामीलाच हिंदुस्थानचा अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आणि मालविका बनसोडला पराभवाची झळ सहन करावी लागली. मात्र मात्र पी. व्ही. सिंधू हिने दुसऱया फेरीत प्रवेश केला.

2021 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या लक्ष्य सेनने सलामीच्या लढतीत कडवी झुंज दिली असली तरी त्याला 21-12, 19-21, 14-21 अशी हार पत्करावी लागली. 22 वर्षीय लक्ष्यने पहिला गेम जिंकून आगेकूच केली होती, मात्र नंतरच्या दोन गेममध्ये जबरदस्त झुंज देऊनही त्याला पराभवाचे तोंड पाहावे लागले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाने हुलकावणी दिल्यानंतर गेल्या आठवडय़ात लक्ष्यला फिनलँडमधील आर्क्टिक ओपनमध्ये दुसऱया फेरीतच हार पत्करावी लागली होती.

दोन ऑलिम्पिक पदके जिंकणार्या पी. व्ही. सिंधूला दुसऱया फेरीत पोहोचण्याची संधी मिळाली. चायनीज तैपेईच्या पाय यू पो विरुद्धच्या सामन्यात सिंधू 21-8, 13-7 अशा आघाडीवर असताना प्रतिस्पर्धीने माघार घेतल्यामुळे तिला विजयी घोषित करण्यात आले. श्वेतपर्ण आणि ऋतुपर्ण या पांडा भगिनींनाही पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला. त्यांच्यावर चायनीज तैपेईच्या चँग चिंग हुई आणि यँग चिंग यांनी 18-21, 22-24 अशी मात केली.