व्हायरल व्हिडीओची धमकी देऊन खंडणीची मागणी

प्रातिनिधिक फोटो

अश्लील व्हिडीओ व्हायरलची धमकी देऊन तरुणीकडे खंडणीची मागणी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

तक्रारदार तरुणी ही अंधेरी येथे राहते. दोन महिन्यांपूर्वी तिची सोशल मीडियावर एकाशी ओळख झाली होती. ओळखीनंतर ते चांगले मित्र झाले. त्या दरम्यान त्यांनी मोबाईल नंबर शेअर केले होते. तो अनेकदा तिच्याशी व्हिडीओ कॉलवर संभाषण करत असायचा. प्रेम असल्याचे सांगून तो तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. व्हिडीओ कॉल सुरू असताना त्याने तरुणीचे व्हिडीओ तयार केले होते. त्यानंतर त्याने बनावट आयडी तयार करून तिला मेसेज करण्यास सुरुवात केली. तो तिच्याकडे वारंवार पैशाची मागणी करायचा.

जर पैसे दिले नाही तर ते व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करू अशी धमकी देत असायचा. त्या घटनेने तरुणी प्रचंड घाबरली. तिने त्याची पोलिसात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिने अंबोली पोलीस ठाण्यात धाव घेतली. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.