पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱयांवर कडक कारवाईची मागणी

पुणे येथील कल्याणीनगरमध्ये बिल्डर विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांत याने दारूच्या नशेत भरधाव गाडी चालवत दोघांना चिरडून मारले, मात्र वेदांतवर कडक कारवाई करण्याऐवजी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न पुणे पोलिसांकडून होत आहे. त्याबद्दल पुणेकरांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. आज त्याचे राजकीय पडसादही उमटले. दोन निष्पाप जिवांचा बळी गेला असतानाही पोलीस मृतांच्या टाळूवरचे लोणी खात असून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱया पोलिसांवर कडक कारवाई करा, अशी मागणी विरोधी पक्षातील नेत्यांनी केली आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल करताना पोलिसांनी वेदांत अग्रवालला किरकोळ कलमे लावली. त्याला तातडीने रात्रीच कोर्टात हजर करून जामीनही मिळाला. पोलिसांची ही भूमिका संशयास्पद असून अपघात प्रकरण दडपणाऱया पोलीस अधिकाऱयांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

पोलिसांनी वेदांतला

वाचवण्यासासाठी एवढी तत्परता का दाखवली? पोलिसांवर कोणाचा राजकीय दबाव होता का? याची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत. ज्या पोलिसांनी हे प्रकरण हाताळले त्या सर्वांना निलंबित करून कठोर कारवाई केली पाहिजे, असे काँग्रेसचे मुख्य प्रवत्ते अतुल लोंढे म्हणाले. महाभ्रष्ट युती सरकारच्या काळात राज्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. पुणे शहराचा सांस्कृतिक व शैक्षणिक नगरी असा लौकिक आहे, पण त्याला काळिमा फासण्याचे काम या महायुतीने केले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांना दानवेंचे पत्र

बिल्डर विशाल अगरवालवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
अल्पवयीन आरोपी वेदांत याचा बिल्डर पिता विशाल अग्रवाल याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे. विनापरवानगी पोर्शे वाहन वितरीत करणाऱया वितरकावरही कडक कारवाई करावी असेही त्यांनी नमूद केले आहे.

सीसीटीव्ही फुटेज तपासा: धंगेकर

पुणेकरांच्या दबावानंतर पुणे पोलिसांनी अपघातप्रकरणी विशाल अग्रवाल याला अटक केली आहे. परंतु केवळ विशालला अटक करून हे प्रकरण थांबणार नाही तर येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व तपास अधिकारी यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजेत. मोठा आर्थिक व्यवहार झाल्यानंतर तपासात दिरंगाई करत सर्व आरोपींना मदत होईल असाच तपास पोलिसांनी केला आहे. अपघाताच्या रात्री काय झाले याबाबत येरवडा पोलीस ठाणे व ससूनमधील सीसीटीव्ही फुटेज चेक करावे. केवळ पैसेवाल्यांच्या इशाऱयावर नाचणाऱया या व्यवस्थेतील हे भ्रष्ट अधिकाऱयांना निलंबित केले पाहिजे, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली.

सर्वांना समान न्याय हवा: राहुल गांधी

बस, ट्रक, ओला, उबर, रिक्षाचालकाने चुकून अपघात केला आणि त्यात कुणी मारलं गेलं तर त्याला दहा वर्षे कारावास भोगावा लागतो; पण श्रीमंत घरातला मुलगा दारू पिऊन पोर्श गाडी चालवतो आणि दोन लोकांची हत्या करतो तेव्हा त्याला निबंध लिहायला सांगितले जाते. असे निबंध ट्रक, बसचालकांकडून का लिहून घेतले जात नाहीत, असा संताप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. एक अब्जाधीशाचा आणि एक गरीबाचा असे दोन हिंदुस्थान बनले आहेत, असा प्रश्न विचारला. तर मी सगळय़ांना गरीब बनवू का, असा उलट सवाल मोदी करतात. गरीब आणि श्रीमंत सर्वांनाच समान न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठीच आम्ही लढत आहोत. आमची लढाई अन्यायाविरुद्ध लढाई आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

न्यायालयीन चौकशी करा: वडेट्टीवार

या अपघाताची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. अल्पवयीन आरोपी दारू पीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज असूनही त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

पोलीस आयुक्तांना बडतर्फ करा: संजय राऊत

25 वर्षांचे एक जोडपे एका मस्तवाल बिल्डर पुत्राच्या निष्काळजीपणामुळे, श्रीमंतीच्या माजोरडेपणामुळे रस्त्यावर तडफडून मेले. दोन निष्पाप जिवांचे बळी गेले आणि पुण्याचे पोलीस आयुक्त कोणाला वाचवत आहेत, असा संतप्त सवाल करतानाच याप्रकरणी पोलीस आयुक्तांना बडतर्फ केले पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केली. माजोरडा, दारुडा बिल्डरचा मुलगा दारू पिताना बारमध्ये दिसतोय आणि पोलीस त्याला पिझ्झा-बर्गर खायला घालतात, त्याचा खोटा मेडिकल रिपोर्ट देतात. पुण्यातील लोकांनी या घटनेबद्दल पोलीस आयुक्तांसमोर जाऊन आंदोलन केले पाहिजे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.