आईला कॅन्सर आहे सांगून अजित पवार गटाच्या नेत्याच्या नावावर शाही परिवाराला फसवलं

फसवणूक करण्यासाठी माणसं कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. मुंबईतील जुहू परिसरातील एका उद्योगपतीने चक्क राजकीय नेत्याच्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर करुन फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. राहुल कांत असे आरोपीचे नाव आहे. आरोपीविरोधात आयटी कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या कलमांखाली बनावट आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपीला अटक केली नाही.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल कांत हा मुंबईतील जुहू या उच्चभ्रू परिसरात राहत असून तो व्यवसायाने व्यावसायिक आहे. मात्र सध्या त्याला व्यवसायात नुकसान झाले होते. त्यामुळे तो आर्थिक अडचणीत होता. कांत याच्या आईला कॅन्सर असून तिच्या उपचारासाठी पैशांची गरज होती.

आरोपीने अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा फोटो वापरून व्हॉट्सअपवर फेक अकाऊंट सुरु केले. यानंतर आरोपीने स्वतःचे नाव प्रफुल पटेल असल्याचे सांगून कतारच्या राजघराण्याकडे पैशांची मागणी केली. आईला कॅन्सर असून उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे त्याने सांगितले. यासाठी व्हीआयपी क्रमांकाचा वापर केला.

आरोपीने पेड ॲप लिंकचा वापर केला होता. त्यामुळे व्हीआयपी नंबर मिळवणे सोपे होते. सोशल मीडियावर लोकप्रिय व्यक्ती आणि नेत्यांची नावे वापरणे आणि त्यांची बदनामी करणे सर्रास झाले आहे. ही चिंताजनक बाब आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी सांगितले.

ही घटना 20 जुलै रोजी घडली. सुरुवातीला प्रफुल्ल पटेल यांना आपला फोन हॅक झाला आहे असे वाटले, पण राजघराण्याने त्यांना संपूर्ण घटना सांगितल्यानंतर सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. यानंतर केवळ डिपी पाहून अशा गोष्टींमध्ये फसू नका असे आवाहन प्रफुल पटेल यांनी केले आहे.