महालक्ष्मी मंदिर परिसरात लक्झरी बस व्हॅन स्वच्छतागृहाची व्यवस्था करा, भाविकांची पालिकेकडे मागणी

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व जगप्रसिद्ध असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी दररोज हजारोच्या संख्येने भाविक येत असताना या ठिकाणी स्वच्छतागृहांची कमतरता असल्याने महिला, मुले आणि ज्येष्ठांसह सर्वच भाविकांची गैरसोय होते. त्यामुळे पालिकेच्या डी वॉर्डने या ठिकाणी लक्झरी बस व्हॅन स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजेश माजगुणकर यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

महालक्ष्मी उत्सवाच्या काळात म्हणजेच दसरा, दिवाळी, मार्गशीर्ष, रविवार सुट्टीच्या दिवशी या परिसरात भक्तांच्या दर्शनाच्या गर्दीचा महापूर लोटत असतो. मात्र मंदिर परिसरात सुलभ शौचालय नसल्यामुळे दर्शनाकरिता तासन्तास उभे राहत असलेल्या महिलांची फार असुविधा व कुचंबणा होत असते.

महालक्ष्मी मंदिर परिसरात कंपाऊंडमध्ये सुलभ शौचालयाची सुविधा नसल्यामुळे लहान मुले, तरुणी, महिला व ज्येष्ठ नागरिकांकडून विभागात असलेल्या चाळीतील शौचालयाचा वापर केला जातो. ही गैरसोय टाळण्यासाठी पालिकेच्या डी वॉर्डने महिला स्वच्छतागृह लक्झरी बस व्हॅन महालक्ष्मी मंदिर परिसरात ठेवण्यासाठी पुढाकार घेऊन सुविधा करावी, अशी मागणी राजेश माजगुणकर यांनी केली आहे.