रेल्वेत प्रवाशाच्या जेवणात आढळली ‘गोम’; IRCTC च्या खाद्यपदार्थांच्या दर्जावर प्रवाशांचा संताप

इंडियन रेल्वेतर्फे प्रवाशांना देण्यात येणाऱ्या जेवणाबाबात दिवसेंदिवस तक्रारी वाढत आहेत. वंदे भारतपासून ते अगदी सामान्य ट्रेनमध्ये अनेकदा खराब झालेले अन्न दिले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. अशातच आता पुन्हा एकदा एका रेल्वे प्रवाशाला जेवणाबाबत विचित्र अनुभव आला आहे. प्रवाशाने मागवलेल्या रायत्यामध्ये गोम आढळून आली असून त्याने याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे IRCTC च्या खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

आर्यांश सिंग असे या प्रवाशाचे नाव असून तो दिल्लीचा रहिवाशी आहे. आर्यांश रेल्वेच्या आयआरसीटीसीच्या व्हीआयपी एक्झिक्युटिव्ह लाउंजमध्ये प्रवास करत असताना त्याला एक भयंकर अनुभव आला आहे. रेल्वे प्रवासात असताना आर्यांशने जेवण मागवले होते. या जेवणात त्याने रायता देखील मागवला होता. यावेळी त्या रायत्यामध्ये त्याला जीवंत गोम तरंगताना दिसली. आर्यांशने याचा फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आयर्यांशने X वर हा फोटो शेअर केला असून रेल्वेच्या भोंगळ कारभाराची पोलखोल केली आहे. ही घटना IRCTC च्या VIP एक्झिक्युटिव्ह लाउंजमध्ये घडली. रेल्वेच्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता खरोखरच वाढली आहे. आता ते रायत्यासोबत एक्स्ट्रा प्रोटीनही देत आहेत, अशी टीका करणारी पोस्टमध्ये त्याने लिहिली आहे. दरम्यान, आर्यांशची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, या घटनेमुळे सध्या सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. अनेक युजर्सनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हिंदुस्थानातील सर्वात उच्च दर्जाच्या रेल्वेत देखील हे प्रकार घडत असलीत. तर हे खूपच गंभीर आहे.
त्यामुळे आता IRCTC च्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.