नवऱ्याला नपुंसक म्हणून तपासणी करायला लावणं हे मानसिक क्रौर्य – उच्च न्यायालय

नवऱ्याला नपुंसक म्हणून हिणवून त्याला त्याचं पौरुषत्व सिद्ध करण्यासाठी तपासणी करायला लावणं हे मानसिक क्रौर्य असल्याचा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. त्याच वेळी नवऱ्यावर चारित्र्यहीन असल्याचे आरोप करणं हेही परस्परविरोधी आणि क्रूर असल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

या प्रकरणात पत्नीने कुटुंब न्यायालयाच्या घटस्फोटाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यात तिने नवऱ्यावर विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप केले होते. पण, तिला ते सिद्ध करता आले नाहीत. त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने तिची याचिका फेटाळत कुटुंब न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

मित्राच्या पत्नीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा चुकीचा आरोप करणं, जेणेकरून त्याची सार्वजनिक जीवनातील प्रतिमा मलीन होईल, ही निव्वळ क्रूर वागणूक आहे. पत्नीने पती नपुंसक असल्याचा दावा करत त्याची चाचणी करण्याची मागणी केली होती. त्या चाचणीत तो सुदृढ असल्याचं निष्पन्न झालं होतं. एकिकडे पत्नी नवऱ्यापासून प्रेम, आदर आणि संरक्षणाची अपेक्षा करते. पण, त्याचवेळी तिने स्वतः देखील त्याच्यासाठी तेच करणं अपेक्षित आहे. नवऱ्याच्या वैवाहिक निष्ठेवर संशय व्यक्त करणं, त्याला आपल्या मुलापासून विभक्त करणं ही क्रूरता आहे, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.