देशाला हुकुमशाहीपासून वाचवण्यासाठी तुरुंगात जातोय; सरेंडर करण्यापूर्वी केजरीवालांनी जारी केला भावूक व्हिडीओ

कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अंतरिम जामिनाचा कालावधी वाढवण्यासाठी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. मात्र या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्याने केजरीवाल यांना 2 जू रोजी सरेंडर करावे लागणार आहे. तत्पूर्वी केजरीवाल यांनी एक भावूक व्हिडीओ शेअर केला.

सर्वोच्च न्यायालयाने मला लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी 21 दिवसांचा अवधी दिला होता. हा अवधी उद्या 1 जून रोजी संपत आहे. त्यामुळे परवा (2 जून) रोजी मी पुन्हा सरेंडर करायचे असून मी पुन्हा तुरुंगात जाईल. ही लोकं मला किती काळ तुरुंगात ठेवतील हे माहिती नाही. पण मी देशाला हुकुमशाहीपासून वाचवण्यासाठी तुरुंगात जात आहे. याचा मला अभिमान आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

त्यांना मला अनेकदा झुकवण्याचा, वाकवण्याचा प्रयत्न केला. पण मी झुकलो नाही. तुरुंगात असताना त्यांनी माझा नानाविध प्रकारे छळ केला. माझी औषधे बंद केली. मला 30 वर्षांपासून मधुमेह आहे. मी दिवसातून 4 वेळा इन्सुलिनचे इंजेक्शन घेतो. त्यांना अनेक दिवस मला इंजेक्शन दिले नाही. पण मी झुकलो नाही, झुकणार नाही. मी कुठेही असूद्या आत किंवा बाहेर, तुमचे (दिल्लीकर) मोफक वीज, मोहल्ला क्लिनिक, रुग्णालये, मोफत औषधे, उपचार, 24 तास वीज आणि इतर गोष्टी चालूच राहतील. परत आल्यावर प्रत्येक आई आणि बहिणीला दरमहा 1000 रुपये देण्यास सुरुवात करेन, असेही केजरीवाल म्हणाले.

दिल्लीकरांनो तुमची काळजी घ्या. मला तुरुंगातही तुमची चिंता वाटते. तुम्ही आनंदी राहिलात की तुमचा केजरीवालही आनंदी राहील. मी तुमच्यात नसलो तरी चिंता करू नका. सर्व काही पहिल्यासारखे सुरुच राहील, असेही केजरीवाल म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी कुटुंबियांसाठीही दिल्लीकरांना आवाहन केले.

आज मला तुमच्याकडून माझ्या कुटुंबासाठी काहीतरी मागायचे आहे. माझे आई-वडील वयोवृद्ध आहेत. आई खूप आजारी आहे. मला तिची तुरुंगात खूप काळजी वाटते. मी तुरुंगात गेल्यानंतर माझ्या आई-वडिलांची काळजी घ्या. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. प्रार्थनेत मोठी ताकद असते, असेही ते म्हणाले.

माझी पत्नी सुनीता खंबीर आहे. संकटाच्या प्रत्येक क्षणाला तिने मला खंबीरपणे साथ दिली. संकट येते तेव्हा संपूर्ण कुटुंब एकजूट होते. आम्ही सर्व मिळून देशाला वाचवण्यासाठी हुकुमशाहीविरोधात लढतोय. याविरोधात लढताना माझा जीव गेला तरी शोक व्यक्त करू नका. तुमच्या प्रार्थनांमुळेच मी जीवंत आहे. ईश्वरानी इच्छा असेल तर तुमचा मुलगा लवकरच बाहेर येईल, असेही केजरीवाल शेवटी म्हणाले.