भाजपला मुख्यमंत्री निवास काबीज करायचे आहे, आप नेते संजय सिंह यांचा आरोप

कथित दिल्ली मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी जामिनावर तुरूंगातून बाहरे आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यानंतर दिल्लीतील राजकारण तापले आहे. केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर आपच्या वरिष्ठ नेत्या आतिशी यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. परंतु अद्यापही त्यांनी मुख्यमंत्री निवास देण्यात आलेले नाही. यावरून आपच्या इतर नेत्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

आपचे खासदार संजय सिंह यांनी मुख्यमंत्री निवासावरून भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपला मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ताब्यात घ्यायचे आहे असा आरोप त्यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांना खोटी आश्वासने देत आहे. असे अनेक डावपेच त्यांनी दिल्लीतही खेळले आहेत. आमच्या पक्षाला तोडण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या 27 वर्षांपासून भाजप दिल्लीत निवडणुका लढत आहे. मात्र निवडणुका हरल्यावर त्यांनी आम आदमी पार्टी आणि केजरीवाल यांना संपवण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर आमचे कार्यकर्ते आणि नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न झाला. त्यातही ते अपयशी ठरले त्यामुळे आता त्यांना मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान काबीज करायचे आहे. असा हल्लाबोल त्यांनी भाजपवर केला.

अरविंद केजरीवालांनी मुख्यमंत्री निवास स्थान सोडल्यावरही भाजपने अपप्रचार केला. कागद दाखवत ते म्हणाले की अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान रिकामे केल्याचे हे प्रमाणपत्र आहे. मात्र यानंतर मुख्यमंत्री या नात्याने आतिशी यांना त्या निवासस्थानात जायचे होते, परंतु मुख्यमंत्री असूनही ते निवासस्थान मुख्यमंत्री आतिशी यांना दिले जात नाही. आता ज्यांना निवडणूक जिंकता येत नाही आणि मुख्यमंत्री बनता येत नाही त्यांना मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान काबीज करायचे आहे.’ असेही ते यावेळी म्हणाले.