तुरुंगाच्या सळ्यांनी मी खचणार नाही, लढत राहणार; तिहारमधून बाहेर येताच मुख्यमंत्री केजरीवाल भाजपवर बरसले

सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास तिहार तुरुंगातून बाहेर आले. तुरुंगातून बाहेर येताच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टीचे समर्थक आणि पक्षाच्या नेत्यांना संबोधित केलं. लाखो नागरीकांनी माझ्यासाठी प्रार्थना केली होती. त्यांच्या प्रार्थनेमुळे मी आज तुरुंगातून बाहेर आलो आहे, असं मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले.

या लोकांनी मला तुरुंगात टाकलं, असं म्हणत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला. केजरीवालला तुरुंगात टाकल्यावर तो खचून जाईल, असं (BJP) त्यांना वाटलं. मात्र, माझं मनोधैर्य आणि शक्ती 100 पटीने वाढली आहे. तुरुंगाच्या मोठ-मोठ्या भिंती आणि लोखंडी सळ्या माझं खच्चीकरण करू शकत नाही, असं मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावलं.

परमेश्वराने आतापर्यंत जे बळ मला दिलं आहे, अशाच प्रकारे देवाने योग्य मार्ग दाखवत रहावं. मी देशसेवा करतो आणि ज्या राष्ट्रविरोधी शक्ती आहेत, देशाचं विभाजन आणि कमकुवत करण्याचं काम करत आहेत, त्यांच्याविरोधात जन्मभर लढत राहीन, असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ठणकावले.