विश्वचषक तिरंदाजीत दीपिका कुमारीला रौप्य

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिरंदाज दीपिका कुमारीला एकही पदक जिंकता आले नव्हते; मात्र तिने आपल्या लौकिकानुसार विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत रौप्य पदक विजेती कामगिरी करण्याचा पराक्रम केला. दीपिकाचे हे तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेतील सहावे पदक ठरले आहे. तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दीपिकाला चिनच्या ली जियामन हिने कडवी झुंज दिली.

जियामन हिने दीपिकाला 6-0 अशा फरकाने पराभूत केले. त्यामुळे दीपिकाच्या सुवर्णपदकाच्या आशा मावळल्या. मात्र, दीपिकाने संयमाने खेळ करत रौप्यपदकावर आपले नाव कोरले. चीनच्या जियामनने प्रथमच या स्पर्धेत सहभाग घेतला होता. पहिल्या प्रयत्नातच तिने सुवर्ण पदक पटकावण्याचा कारनामा करून दाखवला आहे. दरम्यान, दीपिकाने यापूर्वी तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चार वेळा रौप्य, तर एक वेळा कांस्य पदक पटकावले आहे. मात्र, या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावण्याची तिची इच्छा अद्याप अपूर्णच राहिली आहे.