एलएलबीच्या मध्यावरच परीक्षेसाठी अपात्र ठरवले!

तीन वर्षांच्या एलएलबी पदवीचे शिक्षण घेत असताना मध्यावरच विद्यार्थ्याला मुंबई विद्यापीठाने पाचव्या सेमिस्टरसाठी अपात्र ठरवले. विद्यापीठाच्या या भूमिकेला विद्यार्थ्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्याच्या याचिकेवर सुट्टीकालीन खंडपीठाने तातडीने सुनावणी घेतली आणि त्याला एलएलबीच्या पाचव्या सेमिस्टरला बसण्यास मुभा देण्याचे निर्देश मुंबई विद्यापीठाला दिले. त्यामुळे विद्यार्थ्याला न्याय मिळाला असून मुंबई विद्यापीठाला चपराक बसली आहे.

विलेपार्लेतील साठये महाविद्यालयात कला शाखेतून पदवी प्राप्त केलेल्या रोहन थत्ते या विद्यार्थ्याने एलएलबीसाठी चेंबूर कर्नाटक लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र प्रवेश होऊन दुसरे वर्ष सुरु झाल्यानंतर विद्यापीठाने रोहनला एलएलबीसाठी आवश्यक गुण मिळाले नसल्याची त्रुटी काढत तिसऱया व चौथ्या सेमिस्टरला बसण्यास अपात्र ठरवले होते. विद्यापीठाच्या या भूमिकेमुळे एलएलबीच्या मध्यावरच मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिल्याने रोहनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर नियमित खंडपीठाने त्याला दिलासा देत तिसरी आणि चौथी सेमिस्टर देण्याचा मार्ग मोकळा केला होता. मात्र पुन्हा पाचव्या सेमिस्टरवेळी विद्यापीठाने तेच आडमुठे धोरण अवलंबून रोहनला पाचव्या सेमिस्टरसाठी अपात्र ठरवले. याविरोधात रोहनने अॅड. अर्जुन कदम आणि अॅड. विक्रम वालावलकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अंतरिम याचिका दाखल केली. याचिकेची गंभीर दखल घेत न्यायमूर्ती संदीप मारणे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने तातडीने सुनावणी घेतली. तसेच रोहनला अॅडमिट कार्ड/हॉल तिकिट जारी करून एलएलबीच्या पाचव्या सेमिस्टरला बसण्यास मुभा द्या, असे निर्देश मुंबई विद्यापीठ आणि चेंबूर कर्नाटक लॉ कॉलेजला दिले.