गोरेगावातील शासकीय भूखंड मुंबई बँकेला देण्याचा निर्णय रद्द, उद्धव ठाकरे यांनी केला होता विरोध

गोरेगावमधील पशु व मत्स्य विद्यापीठाची तीन एकर जागा मुंबई बँकेला सहकार भवन बांधण्यासाठी देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला होता, पण ही जागा मुंबई बँकेला देण्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोध केला होता. अखेर सरकारने माघार घेतली आणि ही जागा देण्याचा निर्णय रद्द केला आहे.

राज्य सरकारने गोरेगावमधील पशु व मत्स्य विद्यापीठाची अत्यंत मोक्याची जागा शिक्षण संशोधनासाठी दिली होती, पण या मूळ उद्देशात बदल करून ही जागा मुंबई बँकेला देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी ही जमीन महसूल विभागाकडे सोपवण्यात येणार होती. त्यानंतर मूळ उद्देशात बदल करण्याची कार्यवाही महसूल व वन विभागामार्फत करण्यात येणार होती. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आक्षेप घेत ही जमीन मुंबई बँकेला देण्यास विरोध केला होता. त्यानंतर सरकारने माघार घेतली आहे.