अनधिकृतपणे राडारोडा (डेब्रीज) टाकण्याचे प्रकार टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने आता ‘डेब्रीज ऑन कॉल’ ही ऑनलाईन सेवा सुरू केली आहे. 500 किलोग्रॅमपर्यंतची डेब्रीज संकलन सेवा मोफत केली जाणार असून त्यावरील संकलनासाठी माफक दर लावण्यात येणार आहे. त्याचबरोबर ‘मायबीएमसी’ मोबाईल अॅपवरूनही लवकरच ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्षमतेचा शास्त्राेक्त राडारोडा प्रक्रिया प्रकल्प आणि ऑनलाईन सुविधा देणारा देशातील पहिलाच प्रकल्प असल्याचे महापालिकेने म्हटले आहे.
मुंबईतील घरगुतीस्तरावरील बांधकाम आणि पाडकाम यातून निर्माण होणारा राडारोडा (डेब्रीज) उचलून वाहून नेण्यासाठी मुंबई महापालिकेकडून ‘डेब्रीज ऑन कॉल’ ही सेवा 2014 पासून पुरवली जाते. घरगुती तसेच लहान स्तरांवरील बांधकाम, पाडकाम, दुरुस्तीची कामे यातून निर्माण होणारे डेब्रीज संकलन करून वाहून नेण्यासाठी ही सेवा माफक दरात कार्यरत आहे. महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभाग कार्यालय (वॉर्ड) निहाय ही सेवा उपलब्ध आहे. राडारोडा संकलनापासून ते प्रक्रियेपर्यत ऑनलाईन प्रणालीद्वारे हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याने ही सेवा अधिक सुलभ, जलद होणार आहे. प्रतिदिन 1200 टन प्रक्रिया ही क्षमता लक्षात घेता महाराष्ट्रातील सर्वात मोठा असा हा प्रकल्प आहे. ‘डेब्रीज ऑन कॉल’ सेवेसाठी रक्कमदेखील ऑनलाईन पद्धतीने प्रदान करण्याची सुविधा मुंबईकरांना मिळणार आहे.
टोल फ्री क्रमांक – ‘डेब्रीज ऑन कॉल’करिता मुंबई शहर व पूर्व उपनगरांमधील नागरिकांसाठी 1800-202-6364 या टोल फ्री क्रमांकावर व पश्चिम उपनगरांतील नागरिकांसाठी 1800-210-9976 या टोल फ्री नंबरवर सकाळी 8 ते संध्याकाळी 8 या वेळेत संपर्क साधता येईल.