भोपाळमध्ये काळवीटाची शिकार, मानेवर गोळीचा घाव

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये काळवीटाची शिकार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. भोपाळ पासून 40 किलोमीटरच्या अतंरावर एका शेतामध्ये काळवीट मृत अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आज तक या हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, भोपाळ पासून 40 किलोमीटरच्या अंतरावर सोमवारी (21 ऑक्टोबर 2024) रात्री काळवीटाची शिकार करण्यात आल्याची शक्यता आहे. सदर घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेत काळवीटाचा मृतदेह ताब्यात घेत भोपाळ येथील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केला. काळवीटाच्या फक्त मानेवर गोळीचा घाव आढळून आला आहे. याव्यतिरिक्त शरीरावर एकही जखम नाही. त्यामुळे ठरवून काळवीटाची शिकार केल्याचा अंदाज वनविभागाला आहे. काळवीटाचा मृतदेह शवविच्छेधनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. तीन दिवसांनी त्याचा रिपोर्ट येईल आणि त्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती वनविभागाने दिली.