मुद्दा – डहाणू लोकलचा प्रश्न

>> दयानंद पाटील

डहाणू लोकलचा प्रश्न खूप मोठा आहे. आज वैतरणा ते डहाणूदरम्यानच्या प्रत्येक प्रवाशांकडून नाराजीचे सूर निघत आहेत. डहाणू लोकल 2013 सुरू होऊन दहा वर्षे पूर्ण झाली आहेत, परंतु या मागील दहा वर्षांत डहाणू लोकलच्या किमान दहा फेऱ्यासुद्धा वाढल्या नाहीत. उलट सुरू असलेल्या पिकअवरच्या फेऱ्या, कोरोना काळात बंद केलेल्या लोकल अजूनही सुरू केलेल्या नाहीत. दहा वर्षांत सरासरी फक्त आजपर्यंत 2 अप- 2 डाऊन फेऱ्या वाढल्या आहेत. आज डहाणू लोकलच्या 19अप-19 डाऊन फेऱ्या होत आहेत. त्यातील 2013 साली 10 अप-10 डाऊन डहाणू लोकलच्या फेऱ्या सुरू झाल्या होत्या. त्याचे समीकरण मांडल्यास यात इतर 7 अप- 7 डाऊन डहाणू लोकलच्या फेऱ्या होत आहेत. त्या शटल, मेमू बंद करून त्याऐवजी धावत आहेत.

अशा परिस्थितीत पश्चिम रेल्वेने याबाबतीत नक्कीच निरीक्षण करायला हवे की, डहाणू विभागातील प्रवाशांना डहाणू लोकलच्या किती फेऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. या सर्व गोष्टींचा आताच्या सर्वच लोकप्रतिनिधींनी अभ्यास करून डहाणू विभागातील प्रवाशांच्या समस्या तत्काळ सोडवायला हव्यात. अन्यथा असा प्रश्न पडतो की, डहाणू लोकल ठरवू शकते का पालघर लोकसभेचा निर्णय? डहाणू विभागातील प्रवासी त्रस्त आहेत, त्यांच्या समस्यांचे निरसन होणे अतिशय आवश्यक आहे. 2023 वर्ष आता संपले. 2024 सुरू झाले. हे वर्ष लोकसभेच्या निवडणुकीचे. अपेक्षा आहे, जानेवारी 2024 ला तरी डहाणू लोकलच्या काही फेऱ्या वाढविण्यासाठी डहाणू विभागातील राजकीय लोकप्रतिनिधींनी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील तशी करायला हवी जेणेकरून प्रवाशांचा विश्वास वाढेल आणि त्यांची ही विश्वासार्हता वाढेल.