आंतरराष्ट्रीय क्रिकेटला वॉर्नरचा गुडबाय

ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने अखेर वयाच्या 37 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय केला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी सोशल मीडियावर पोस्ट करून वॉर्नरच्या निवृत्तीची अधिकृत घोषणा केली अन् त्याच्या 15 वर्षांच्या देदीप्यमान कारकीर्दीला पूर्णविराम मिळाला.

ऑस्ट्रेलियन संघाच्या नजरा आज टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमधील अफगाणिस्तान-बांगलादेश यांच्यातील अखेरच्या सुपर-8 लढतीवर होत्या. ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपची उपांत्य फेरी गाठली असती तर डेव्हिड वॉर्नरची निवृत्तीही लांबणीवर पडली असती, मात्र अफगाणिस्तानने बांगलादेशला हरवून ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कपमधून बाहेरचा रस्ता दाखविला. त्यामुळे वॉर्नरच्या निवृत्तीवरही शिक्कामोर्तब झाले. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीराने 2009 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीने होबार्टमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तर 2011 ला ब्रिस्बेनमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. वन डे आणि कसोटी क्रिकेटमधून आधीच निवृत्त झालेल्या वॉर्नरने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी गरज असल्यास मी उपलब्ध असेन, असे म्हटले होते.