दापोलीत गारठले, हुडहुडी भरली; पार 8.8 अंशांच्या खाली आला

मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीत शनिवारी पारा 8.8 अंश इतका खाली घसरल्याने दापोलीकरांना चांगलीच हुडहुडी भरली. राज्यात आता थंडीने चांगलाच जोर धरला असून अनेक ठिकाणी गारठा वाढला आहे. दापोलीतही तापमानात घट झाल्याने दापोली गारठले आहे.

दापोली तालुक्यात यावर्षीच्या हंगामात शनिवारी 30 नोव्हेंबर रोजी 8.8 अंश ही सर्वात निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे संपूर्ण राज्यातही त्याचे परिणाम दिसून येत आहेत. यंदा थंडीच्या हंगामाला तशी उशीराच सुरवात झाली . त्यातच 21 नोव्हेंबरपासूनच तापमानात घसरण होत थंडीचा पारा दररोज खाली उतरत चालल्याने दापोलीकरांना हुडहुडी भरू लागली आहे. त्यामुळे गरम स्वेटर आणि पांघरूण खरेदीसाठी लोक कपड्यांच्या दुकानात गर्दी करु लागले आहेत.तर अनेक ठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत.

दापोली येथील डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामान केंद्रात गुरुवारी 21 नोव्हेंबरला कमाल 10.9 अंश तपमानाची नोंद झाली होती. त्या नंतर हेच तपमान पुन्हा 12 अंशावर जावून स्थिरावले असतानाच पुन्हा बुधवारी 27 नोव्हेंबर रोजी 10.5 अंश गुरूवारी 28 नोव्हेंबरला 9.9 अंश, 29 नोव्हेंबरला 9 अंश तर शनिवारी 30 नोव्हेंबर रोजी 8.8 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंद झाली आहे. त्यामुळे संपूर्ण दापोली तालुका गारठला आहे. त्यामुळे सकाळी 11 वाजेपर्यंत हवेत भरपूर प्रमाणात गारठा असतो. त्यानंतर सायंकाळी पून्हा साधारणपणे 5 वाजल्यानंतर गारठा जाणवण्यास सुरूवात होते. त्यामुळे लोक आपली कामे आटोपून लवकरच घरी जाणे पसंत करतात. लोकांना थंडीची हुडहुडी भरत असली तरी आंबा काजू मोहरण्यासाठी थंडीचे वातावरण पोषक असल्याने फळबागायतदार समाधानी आहेत.