पैसे झाले खावून, रस्ता गेला वाहून; सरकारच्या कामावर स्थानिकांचा रोष

दापोली तालूक्यात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याने नदी नाले परे यांना पुर आल्याने रस्ते उखडण्याच्या घटना घडल्या आहेत मात्र नवानगर कोंथळकोंड माटवण झोलाई मंदिर नावाचा आणि शासनाच्या बजेट (अर्थसंकल्प 2023) या शीर्षकाखालील योजनेतून मंजूर झालेल्या 85 लाखांच्या रक्कमेतून  होणारे 2 कि.मी. अंतराच्या लांबीचे काम मे 2024 अखेर पूर्ण करण्यात आले. असे हे काम कोंथळकोंड देसाई वाडीनजिक असलेल्या एका ओहोळा ठिकाणी ओहळावर असलेल्या मोरीवरील रस्ता पहिल्याच पावसात वाहुन गेला आहे. वास्तविक पाहता ओहोळाला येणऱ्या पाण्याच्या प्रवाहाकडील बाजू वाहून जायला हवी होती मात्र नेमके प्रवाहाच्या विरोधी बाजूडील बाजू वाहून गेल्याने कामाच्या दर्ज्यावरच प्रश्न उपस्थित होत आहे.

दापोली तालूक्यातील कोंथळकोंड या गावाहून माटवणकडे जाणारा नवानगर कोंथळकोंड माटवण झोलाई मंदिर नावाचा नव्याने तयार करण्यात आलेला रस्ता  हा बजेट 2023 या शार्षकाखाली मंजूर झाला होता.  या मंजूर रस्त्याचे काम मे 2024 अखरे पूर्ण करण्यात आले. असा हा रस्ता नेमका पाण्याच्या येणा-या प्रवाहाच्या विरूध्द दिशेला रस्ता उखडून वाहुन गेला आहे. या प्रकारामुळे कामाचा दर्जा  दिसून येतो. त्यामुळे कामावर देखरेख करणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिका-यांनी या कामाची निट देखरेख केली नाही का? या कामाची क्वाॅलिटी कंट्रोल बोर्डाकडील पाहणी आवश्यक वाटलीच नाही का?  असे प्रश्न रस्त्याच्या कामाचा दर्जा पाहता आता उपस्थित होत आहेत.

सामान्य नागरिकांचा कर रूपाने शासनाच्या तिजोरीत जमा होणारा पैसा तसेच शासनाने विकास कामासाठी कर्जरूपाने उभारलेल्या निधीतून विविध ठिकाणची विकास कामे होत असतात. तशाच प्रकारे बजेटमधून हे काम मंजूर होते. या कामाची गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती. पहिल्याच पावसात सुमार दर्जाच्या कामामुळे रस्ता वाहून जातो ही बाब खरी तर एकुणच रस्त्याच्या कामाचा दर्जा काय आहे हे सांगून जाते त्यामुळे या कामावर देखरेख करणारे अधिकारी  हे काम सुरू असताना नेमके काय करीत होते याची चौकशी होणे गरजेचे आहे.

माटवण तसेच माटवण पंचक्रोशितील लोकांना कोंथळकोंड मार्गे दापोलीकेडे जाण्यासाठी तसेच येण्यासाठीचा सर्वात जवळचा मार्ग आहे. अशा नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यातील  एका ठिकाणच्या मोरीचा काही भाग हा वाहून गेल्याने कामाचा सुमार दर्जा दिसून येतो.
– अजित मोरे