बांगलादेशमध्ये पुन्हा तणाव
बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला असून राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलक राष्ट्रपती भवनवर चाल करून गेले. बांगलादेशात शैक्षणिक क्षेत्रात होणाऱ्या भेदभावाविरोधात विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. या संघटनांनी नंतर पंतप्रधान शेख हसीना यांच्या घरावर चाल केली आणि त्यांना देशाबाहेर जाण्यास भाग पाडले. याच संघटना आता राष्ट्रपतींच्या विरोधात आक्रमक झालेल्या दिसल्या. त्यांनी ढाकातील राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढला. आंदोलकांनी पाच मागण्या केल्या असून राष्ट्रपतींनी राजीनामा द्यावा, अशी एक मुख्य मागणी आहे.
आयआयटी विद्यार्थ्याचा हॉस्टेलमध्ये मृत्यू
फेब्रुवारी महिन्यात एमटेकच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा हॉस्टेलच्या खोलीत संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. मुलाची हत्या झाल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला होता. आता दिल्लीच्या आयआयटी हॉस्टेलमध्ये पदव्युत्तर पदविकेच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा हॉस्टेलमधील त्याच्या खोलीत संशयास्पदरीत्या मृत्यू झाला आहे. पोलिसांना यात आत्महत्येचा संशय असून हत्येची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे. बुधवारी पोलिसांना दिल्ली आयआयटी हॉस्टेलमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती देणारा फोन आला होता. हा विद्यार्थी झारखंडचा रहिवासी आहे.
पर्यावरण संरक्षण कायदा दंतहीन
दिल्लीतील प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याच्या आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. सुधारणांद्वारे तयार केलेला पर्यावरण संरक्षण कायदा हा दंतहीन असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यावेळी अतिरिक्त महाधिवक्ता ऐश्वर्या भाटी यांनी न्यायालयाला आश्वासन दिले की 10 दिवसांत कायदा कार्यान्वित केला जाईल. कलम 21 नुसार शुद्ध हवा हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून पंजाब, दिल्ली आणि हरयाणा या राज्यांनी दिलेल्या प्रस्तावावर दोन आठवड्यांत निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले.
औद्योगिक दारूबाबत कायदा करण्याचा अधिकार राज्यांना, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
औद्योगिक दारूबाबत कायदा करण्याचा अधिकार केंद्राला नसून राज्य सरकारला आहे. त्यांचा अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. सर्वोच्च न्यायालयाने 8-1 अशा बहुमताने हा निर्णय दिला. औद्योगिक अल्कोहोलचे नियमन करण्याचा अधिकार राज्यांना असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले. नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने 1997 मध्ये सात न्यायाधीशांच्या खंडपीठाचा निर्णय रद्द केला. ज्यात म्हटले होते की, इंडस्ट्रियल अल्कोहोलचे उत्पादन आणि पुरवठा नियंत्रित करण्याचा अधिकार केवळ केंद्राला आहे. 2010 मध्ये हे प्रकरण 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आले.
विमानांना मिळणाऱ्या धमक्या रोखण्यासाठी काय केले?, केंद्र सरकारचा एक्स, मेटाला सवाल
विमानांना मिळणाऱ्या बॉम्बच्या धमक्या तसेच अफवा पसरण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही काय केले. यावरून तुम्हीच गुह्यासाठी प्रोत्साहन देत आहात, असाच अर्थ निघतो, अशा शब्दांत केंद्र सरकारने एक्स, मेटा या सोशल मीडिया कंपन्यांना सुनावले. आज एक्स, मेटा आणि विमान कंपन्यांसोबत व्हर्च्युअल बैठक झाली. गेल्या 9 दिवसांपासून 170 हून अधिक विमानांना धमक्या देण्यात आल्या आहेत. यामुळे हवाई उड्डाण क्षेत्राला जवळपास 600 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. देशभरात प्रवासी विमानांना मिळणाऱ्या धमक्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मंगळवारी 50 हून अधिक विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती.
जामिया मीलिया विद्यापीठात तणाव
दिल्लीच्या जामिया मीलिया इस्लामिया विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मंगळवारी रात्री तुफान राडा झाला. दिवाळीनिमित्त आयोजित रांगोळी कार्यक्रमावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत. यावेळी महिला विद्यार्थ्यांवर अभद्र शब्दात टिप्पणीही केली. यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे बंद होत आहेत. त्यामुळे सायंकाळी दिवाळीचा उत्सव साजरा करण्यात येणार होता. यादरम्यान विद्यार्थ्यांच्या एका गटाने अचानक घोषणाबाजी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अनेक विद्यार्थ्यांना मारहाणही करण्यात आली. याबाबतचे वृत्त कळताच आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि सर्व स्थितीवर नियंत्रण मिळवले, अशी माहिती डीसीपी रविकुमार सिंह यांनी दिली. दरम्यान, आज सकाळी विद्यापीठात मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आल्याचे चित्र होते.