जगभरातील महत्वाच्या घडामोडी

दिल्ली स्फोटामागे खलिस्तानी समर्थक

दिल्लीतील रोहिणी येथील प्रशांत विहार भागात झालेल्या स्फोटामागे खलिस्तानी समर्थक गट असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. तपासादरम्यान टेलिग्रामवरील एका चॅनेलवर अशाच एका घटनेचे सीसीटीव्ही फुटेज शेअर करण्यात आली होते. त्याचा हवाला पोलिसांनी दिला आहे. सर्व दाव्यांची तपासणी केली जात असून पोलिसांनी टेलीग्रामला पत्र लिहिले आहे.

गांदरबल जिह्यात कोम्बिंग ऑपरेशन

जम्मू-कश्मीरमधील गांदरबल जिह्यातील गगनगीर भागात दहशतवाद्यांनी स्थलांतरित नागरिकांवर केलेल्या हल्ल्यात सात कामगारांचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आज सुरक्षा दलांनी गांदरबलमध्ये मोठे कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले असून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी कामगार छावणीलगतच्या परिसराला वेढा दिला आहे. एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने दहशतवाद्यांचा माग काढण्यासाठी घटनास्थळी जाऊन पुरावे गोळा करण्याचेही काम सुरू केले आहे.

हिंदुत्व शब्द बदलण्यास न्यायालयाचा नकार

हिंदुत्व या शब्दाऐवजी भारतीय संविधान असा शब्द वापरण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. हा प्रक्रियेचा पूर्ण दुरुपयोग आहे. आम्ही त्यावर विचार करणार नाही, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले. दिल्लीतील विकासपुरी येथील रहिवासी एस एन कुंद्रा यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती.

एलएसीवर घालणार गस्त

हिंदुस्थान आणि चीनमधील संघर्ष मिटण्याच्या मार्गावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यापूर्वी हिंदुस्थान आणि चीनमध्ये मोठा करार झाला असून दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याचे मान्य केले आहे. याद्वारे पूर्व लडाखमधील दोन्ही देशांमधील सीमावाद सोडवला जाऊ शकतो. यामुळे मे 2020 पूर्वीची परिस्थिती पूर्वपदावर येईल असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले.

चंद्रकांत मांजरेकर यांचे निधन

शाहीर चंद्रकांत केशव मांजरेकर (86) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी सोमवार, दि. 28 ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क, दादर येथे होणार असून त्यांचे बारावे आणि तेरावे बुधवार 30 ऑक्टोबर रोजी मीरा रोड येथील राहत्या घरी होणार आहे. शाहीर चंद्रकांत मांजरेकर हे मूळचे राजापूर तालुक्यातील पडवे गावचे रहिवासी. गावच्या विविध उपक्रमांत त्यांचा सिंहाचा वाटा असायचा. त्यांच्या जीवनाला दिशा संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे लाभली.