जगभरातील महत्वाच्या घडामोडी

वाराणसीच्या अनेक मंदिरांतून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या

शहरातील अनेक मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्याची मोहीम ‘सनातन रक्षक दल’ या गटाने सुरू केली आहे. येथील बडा गणेश मंदिरातील साईबाबांची मूर्ती काढून या गटाने मंदिराच्या आवाराबाहेर ठेवली. साईबाबा हे देव असू शकत नाहीत, धर्मग्रंथांत तसा उल्लेख नाही, अशी भूमिका काही महंत, पुजारी यांनी घेतली आहे.

मणिपूरच्या थौबल जिह्यात 48 तासांचा बंद

मणिपूरच्या थौबल जिह्यात अतिरेक्यांनी अपहरण केलेल्या दोन मैतेई तरुणांची सुटका करण्यात अपयशी ठरल्याबद्दल संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या 48 तासांच्या बंदमुळे मंगळवारी दैनंदिन जीवन, व्यवहार विस्कळीत झाले होते. सोमवारी रात्रीपर्यंत युवकांची सुटका न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन आणि जिह्यात संपूर्ण बंद आंदोलन करण्याचा इशारा संयुक्त कृती समितीने दिला होता.

आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेल्या हजारो लोकांनी मेला ग्राउंड, वांगजिंग, याईरीपोक आणि खांगाबोकसह विविध ठिकाणी इम्फाळला मोरेहशी जोडणारा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता, असे पोलिसांनी सांगितले. थौबल शहरातील मेला मैदानाजवळील नाकाबंदीच्या ठिकाणी महिला आंदोलक महामार्गावर बसून राहिल्या, तर तरुणांनी वाहतूक रोखण्यासाठी अनेक ठिकाणी जुने टायर जाळले.

थायलंडमध्ये स्कूल बस पेटून 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू

बँकॉक येथील खू खोत भागात सहलीवरून परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एका शालेय बसला दुपारी साडेबाराच्या सुमारास लागलेल्या आगीत होरपळून 25 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. बसमध्ये एकूण 39 मुले आणि 5 शिक्षक असे 44 जण होते. त्यापैकी 16 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीएनजीवर चालणाऱ्या या बसचे टायर फुटल्याने आग लागल्याचे घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. थायलंडचे पंतप्रधान पायटोंगटार्न शिनावात्रा यांनी या प्राणहानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

हुथी बंडखोरांचा पुन्हा जहाजांवर हल्ला

लाल समुद्रातून जाणाऱ्या एका व्यापारी जहाजावर मंगळवारी हुथी बंडखोरांनी स्फोटकांनी भरलेले ड्रोन आदळले. तर, एका जहाजावर क्षेपणास्त्र डागून स्फोट घडवून आणला, असे ब्रिटीश लष्करी आणि खाजगी सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.