राज्यातील महत्वाच्या घडामोडी

मिंधे सरकारविरुद्ध गिरणी कामगारांचे आज आंदोलन

गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावर सरकारच्या खोट्या आश्वासनाविरुद्ध गिरणी कामगार उद्या 8 ऑक्टोबर रोजी रस्त्यावर उतरणार आहेत. सकाळी 10 वाजता गिरणी कामगार भारतमाता सिनेमा लालबाग येथे जमणार आहेत. तेथून हुतात्मा बाबू गेनू यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील आणि कामगार मैदान येथे मिंधे सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करतील. या निषेध आंदोलनाचे नेतृत्व कृती समितीच्या समन्वयक जयश्री खांडेकर पांडे, जयप्रकाश भिलारे, गोविंदराव मोहिते, नंदू पारकर,निवृत्ती देसाई आदी कामगार नेते करतील.

हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीत

हर्षवर्धन पाटील यांना तुम्ही विधिमंडळामध्ये पाठवा. मला स्वतःसाठी काहीही मागायचं नाही, तुम्ही त्यांना निवडून आणा, मी त्यांना राज्याची जबाबदारी देण्याचे काम करतो, अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या वेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. डॉ. अमोल कोल्हे, उत्तमराव जानकर, नारायण पाटील, अॅड. तेजसिंह पाटील, महारुद्र पाटील, अंकिता पाटील, राजवर्धन पाटील उपस्थित होते.