राज्यातील महत्वाच्या घडामोडी

हिंदुस्थान बनतोय वैज्ञानिक संशोधनाचे केंद्र!

वैज्ञानिक संशोधनाचे केंद्र बनण्याच्या दिशेने हिंदुस्थानची वाटचाल सुरू आहे. त्यादृष्टीने देशातील नऊ राज्यांमधील 26 विद्यापीठांमध्ये प्रिंगर नेचरच्या माध्यमातून जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार विविध विद्यापीठांमध्ये होणाऱ्या वैज्ञानिक संशोधनांचे अहवाल ‘जर्नल ऑफ बिझनेस अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स’ या नियतकालिकात सुलभतेने प्रकाशित करता येणार आहेत. मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसही (टीस) या कार्यात सहभागी आहे. हिंदुस्थानात मोठ्या प्रमाणात संशोधन होते, परंतु ते अहवाल जगापर्यंत पोहोचत नाहीत. या जर्नलमध्ये प्रसिद्ध होणारे संशोधन अहवाल जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्याने संशोधकांना अधिक प्रोत्साहन मिळू शकणार आहे. ‘टीस’मध्ये आयोजित कार्यक्रमात संस्थेचे अधिष्ठाता प्रा. अनिल सुतार, प्रिंगर नेचरचे हर्ष जगदीसन, व्यंकटेश सर्वसिद्धी, प्रा. शैला राय, निधी गुलाटी आदी उपस्थित होते.

‘ड्राय डे’ सार्वजनिक शांततेसाठीच

जनहित व सार्वजनिक शांततेसाठी ड्राय डे जाहीर करता येईल. तसे कारण दारूबंदीच्या आदेशात जिल्हाधिकारी यांना नमूद करावे लागेल, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. न्या. अतुल चांदुरकर, न्या. गौरी गोडसे व न्या. राजेश पाटील यांच्या पूर्णपीठाने हा निर्वाळा दिला. जिल्हाधिकारी यांना ड्राय डे जाहीर करण्याचे अधिकार आहेत. विशिष्ट एका ठिकाणी किंवा संपूर्ण जिह्यात जिल्हाधिकारी दारूबंदी करू शकतात. हे आदेश जारी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यावर कोणतेही निर्बंध नाहीत, असेही पूर्णपीठाने नमूद केले.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला पाठिंबा

वांद्रे येथील शासकीय निवासस्थानातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी तेथील रहिवाशांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. घाटकोपर येथील गव्हर्न्मेंट क्वार्टर्स रेसिडेंटस् असोसिएशनने जाहीर पाठिंबा दिला आहे. असोसिएशनचे अध्यक्ष योगेश तांदळे, उपाध्यक्ष सनी हौसलमल व अन्य पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंब्याचे पत्र दिले.

सोसायटीच्या पैशाने वाढदिवस; रजिस्ट्रारकडे तक्रार

गृहनिर्माण सोसायटीच्या पैशाने वाढदिवस साजरा झाल्याने याची थेट उपनिबंधक यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत उपनिबंधक यांनी 10 ऑक्टोबर 2024 रोजी याची सुनावणी ठेवली आहे. कांदिवली येथील ग्रीन मेडोज कॉ-ऑ. हा. सोसायटीचे सदस्य अ‍ॅड. शेखर हट्टंगडी यांनी चेअरमन व सेक्रेटरीविरोधात ही तक्रार केली आहे. वाढदिवस साजरा करून सोसायटीच्या पैशाचा गैरवापर करण्यात आला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. उपनिबंधक सतीश देवकते यांनी याप्रकरणी संबंधितांना नोटीस जारी केली आहे. अ‍ॅड. हट्टंगडी यांना कागदपत्रांसह सुनावणीला हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

दोन धारावी बनवण्याचे मिंधे-भाजपचे कारस्थान, काँग्रेसचा हल्ला

धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली धारावीकरांना विस्थापित करून अदानीचे टॉवर उभे करण्याचा भाजप-मिंधे सरकारचा प्रयत्न आहे. धारावीकरांचा तीव्र विरोध असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत भाजप सरकारने अपात्र लोकांना भाडेतत्वावरील घरे देण्याचा जीआर काढला असून दोन धारावी करण्याचा सरकारचा इरादा असून एक अदानीसाठी व दुसरी गरीबांसाठी, असा हल्ला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. काँग्रेसच्या विशेष बैठकीत वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकार आणि अडणीवर तोफ डागली. त्या म्हणाल्या, धारावीच्या लोकांनी धारावी उभी केली, त्यांनाच हुसकावून पंतप्रधान मोदींच्या लाडक्या मित्राला फायदा व्हावा, अशा पद्धतीने सर्व नियम बनवले आहेत.

हर्षवर्धन पाटील आज राष्ट्रवादीत

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व त्यांचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी सोमवार (दि. 7) सकाळी दहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत. इंदापूर शहरातील जुन्या बाजार समितीच्या मैदानावर जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार, पक्षाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार धैर्यशील मोहिते- पाटील, आमदार रोहित पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अजित पवार गटाच्या तालुकाप्रमुखाची हत्या

अजित पवार गटाचे भायखळा तालुकाप्रमुख सचिन कुर्मी (46) यांची शुक्रवारी रात्री भररस्त्यात हत्या करण्यात करून पसार झालेल्या तिघा आरोपींना भायखळा पोलिसांनी पकडले. पूर्ववैमनस्यातून हे हत्या प्रकरण घडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 15 तारखेपर्यंत पोलास कोठडी सुनावण्यात आली. भायखळा पोलिसांनी विविध पथके बनवून आरोपींचा शोध सुरू केला होता. अखेर आनंदा काळे ऊर्फ अन्या (39), विजय काकडे ऊर्फ पप्या (34) आणि प्रफुल्ल पाटकर (26) अशा तिघा आरोपींना पकडण्यात आले. अधिक चौकशी सुरू आहे.