उत्सवाचे उधाण… चढाईचा थरार… लोण्याची लयलूट! मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह

गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा…, बोल बजरंग बली की जय आणि बालकृष्णाच्या जय जयकाराने दुमदुमून गेलेला आसमंत, डीजे-ढोलताशाचा दणदणाट, डोळय़ांचे पारणे फेडणाऱया संस्कृती-परंपरेचे दर्शन, प्रचंड उत्साह आणि श्वास रोखून धरायला लावणारी गोविंदांची हंडीच्या दिशेने चढाई… लोण्याची लयलूट आणि बक्षिसांचा वर्षाव… अशा प्रचंड उत्साही वातावरणात आज मुंबई-महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात दहीहंडी उत्सव पार पडला. गोविंदांचा उत्साह शिगेला पोहचला असताना पावसानेही जोरदार सलामी दिल्याने गोपाळकाल्याला अक्षरशः उधाणच आले. बडय़ा गोविंदा पथकांकडून दहा थर लावण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र या वर्षीही यश आले नाही. त्यामुळे या वर्षीही नऊ थरांचीच ‘नवलाई’ कायम राहिली. या वर्षीच्या दहीहंडीत गोविंदांनी महिला सुरक्षेचा संदेश दिला.

 

सर्वांच्याच लाडक्या श्रीकृष्णाचा मध्यरात्री जन्म झाल्यानंतर अवघ्या आसमंतात जणू आनंदाला उधाणच आले. बालगोपाळांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आणि गोविंदांच्या खोडय़ाही सुरू झाल्या. दहीहंडी उत्सवासाठी अगदी सकाळपासूनच गोविंदांनी कूच केले. अगदी मिळेल त्या वाहनाने गोविंदा पथके मुंबईसह संपूर्ण ठाणे आणि परिसर पिंजून काढत दहीहंडय़ा पह्डत होते, तर अनेक ठिकाणी केवळ शिस्तबद्धपणे थर लावत बक्षिसांची लयलूट केली. आयोजकांकडूनही गोविंदांना सन्मान देत सत्कार करण्यात आला. यामध्ये बेधडकपणे वरच्या थरावर जाणाऱया बालगोपाळांना विशेष बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

 

106 गोविंदा जखमी

मुंबईत दहीहंडी पह्डताना विविध ठिकाणी मिळून 106 गोविंदा जखमी झाले. या जखमींवर पालिकेच्या विविध रुग्णालयांत उपचार करण्यात आले. यामध्ये केईएमध्ये 20, शीवमध्ये 8, नायरमध्ये 6, कूपरमध्ये1 आणि इतर उपनगरीय रुग्णालयांमध्ये 30 जणांना दाखल करण्यात आले. यामधील 15 जणांवर उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करून घेतले असून इतर जखमींना उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

आदित्य ठाकरे यांनी वाढवला गोविंदांचा उत्साह

दहीहंडीचा उत्साह ओसंडून वाहत असताना शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीदेखील विविध दहीहंडी उत्सवांना भेटी देऊन गोविंदांचा उत्साह वाढवला. आदित्य ठाकरे यांनी भायखळा, ताडदेव आणि दक्षिण मुंबईतील अनेक दहीहंडींना भेटी दिल्या. तरुण तडफदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे गोविंदांमध्ये उत्साह संचारला. अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फीही घेतली. काही ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बालगोविंदांचा बक्षिसे देऊन गौरवही करण्यात आला.

 

महिला सुरक्षेची जनजागृती

मुंबई-महाराष्ट्रासह देशभरात वाढलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांमुळे या वर्षीच्या बहुतांशी दहीहंडी उत्सवात गोविंदा पथके आणि आयोजकांकडून महिला सुरक्षेची जनजागृती करण्यात आली. पथनाटय़, घोषवाक्य, वेशभूषा, बॅनर यांच्या माध्यमातून महिला सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली.

 

सेलिब्रिटींचा ठेका, चाहत्यांचा जल्लोष

मुंबई-ठाण्यात आयोजित केलेल्या बडय़ा मंडळांच्या दहीहंडी उत्सवाला हिंदी-मराठी कला क्षेत्रातील सेलिब्रिटींनी हजेरी लावत, गाण्यावर ठेका धरत ‘चार चाँद’ लावले. आपले लाडके हीरो-हिरोइन आल्यामुळे प्रेक्षकांसह गोविंदांनीही जल्लोष केला. सेलिब्रिटींनी चाहत्यांच्या प्रेमाचा आदरपूर्वक स्वीकार केला.