वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

waheeda rehman

चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना 53व्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी सोशल मीडियावर ही घोषणा केली. 69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात वहिदा रेहमान यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

‘‘वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हे जाहीर करताना मला खूप आनंद आणि सन्मानाची भावना आहे. वहिदा यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक भूमिका अत्यंत चोखंदळपणे साकारल्या. रेश्मा आणि शेरा या चित्रपटातील घरंदाज स्त्रीच्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. वहिदा यांनी समर्पण, वचनबद्धता आणि कठोर परिश्रमाने व्यावसायिक उत्कृष्टतेची सर्वोच्च पातळी गाठणाऱ्या एका हिंदुस्थानी नारीच्या सामर्थ्याचे उदाहरण दिले आहे,’’ असे अनुराग ठाकूर यांनी नमूद केले.

पाच दशकांच्या कारकिर्दीत वहिदा रेहमान यांनी 90हून अधिक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. प्यासा, कागज के फूल, चौदवी का चाँद, साहेब बीवी और गुलाम, गाईड, खामोशी आदी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांचे समीक्षकांनी कौतुक केले. आपल्या अभिनय सामर्थ्याच्या जोरावर त्यांनी अनेक पुरस्कार पटकावले आहेत. गाईड (1965) आणि नील कमलमधील (1968) भूमिकांसाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. रेश्मा और शेरा (1971) या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. 1972मध्ये केंद्र सरकारने त्यांचा पद्मश्री देऊन तर 2011मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला.

दुहेरी आनंदाचा क्षण

देव आनंद यांची आज जन्मशताब्दी आहे. सर्वत्र त्याचे सेलिब्रेशन सुरू आहे. अशा क्षणी केंद्र सरकारने या सर्वोच्च पुरस्कारासाठी माझी निवड केली ही माझ्यासाठी दुहेरी आनंदाची बाब आहे. ‘तौफा उनको मिलना था, मुझे मिल गया’ अशी प्रतिक्रिया वहिदा रेहमान यांनी दिली. सध्या मी चित्रपटात फारसे काम करत नाही. त्यामुळे आपल्याला पुरस्कार मिळेल असे मला स्वप्नातदेखील वाटले नव्हते, असेही त्या म्हणाल्या.