तोतया टीसीने पैसे उकळले

विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाकडून तोतया टीसीने दंडाची रक्कम स्वतःच्या ई वॉलेटवर घेतल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

मूळचा बिहारचा रहिवासी असलेला तरुण खार परिसरात राहतो. शनिवारी तो तरुण दादर रेल्वे स्थानकात आला. त्याला कामानिमित्त संभाजीनगर येथे जायचे होते. तो बिदर एक्सप्रेसच्या जनरल डब्यातून प्रवास करत होता. एक्सप्रेस दादरहून कल्याणच्या दिशेला निघाली. तेव्हा एक जण त्याच्याकडे आला. त्याने टीसी असल्याचे भासवून तरुणाकडे तिकिटाची मागणी केली. तिकीट नसल्याने 400 रुपये दंड भरावा लागेल असे तरुणाला सांगितले.

तरुणाने एका नंबरवर फोन करून पैशाची व्यवस्था केली. त्याने स्वतःच्या ई वॉलेटचे स्कॅनर पाठवून पैसे घेतले. पैसे पाठवल्यानंतर तरुणाने पावतीची मागणी केली. तेव्हा तो पावती देण्यास टाळाटाळ करू लागला. एक्सप्रेस कर्जत स्थानकात आल्यावर तरुणाने त्याला खाली उतरवले. याची माहिती गस्तीवर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानाला दिली. त्यानंतर त्याला कर्जत रेल्वे पोलीस ठाण्यात आणले. त्याची कसून चौकशी केली. त्याने त्याचे नाव सांगून तो नाशिकचा रहिवासी असल्याचे पोलिसांना सांगितले. कर्जत पोलिसांनी गुन्हा नोंद करून तो पुढील तपासासाठी दादर रेल्वे पोलिसांकडे वर्ग केला.