अंधेरी पूर्व एमआयडीसी परिसरात भंगारवाडीमध्ये सिलिंडर स्फोटामुळे लाकडाच्या दुकानांना सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. तर शीव पूर्वमध्ये षण्मुखानंद हॉलजवळच्या रेशनिंग कार्यालयाला सायंकाळच्या सुमारास आग लागून कार्यालय जळाल्याची घटना घडली. तर गोरेगाव पूर्व 3003 लोढा फिओरेंझा इमारतीमध्येही आगीचा भडका उडाला. सुदैवाने या तिन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अंधेरीत लागलेल्या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाडय़ा घटनास्थळावर दाखल होऊन आग आटोक्यात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. या आगीत काही कामगार अडकल्याची माहितीही समोर आली होती, मात्र या सर्वांची सुखरूप सुटका केल्याचे समजते. दरम्यान, आगीमुळे आग परिसरातील झोपडय़ा, घरे रिकामी करण्यात आली आहेत. मात्र या आगीत पंधरा ते वीस दुकाने जळून खाक झाल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते.
फटाक्यांच्या आतषबाजीत 11 जण जखमी
मुंबईत दिवाळीनिमित्त सुरू असलेल्या प्रचंड आगीत 11 जण जखमी झाले. जखमींपैकी पालिकेच्या शीव रुग्णालयात चार जण, केईएममध्ये दोन जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये फटाक्यांमध्ये एका 14 वर्षीय मुलाच्या मानेला आणि कानाला दुखापत झाली आहे तर एका पाच वर्षांच्या मुलाच्या डोळय़ाला इजा झाली आहे. नायर रुग्णालयातही फटाक्यांमुळे भाजलेली तीन मुले आणि दोन तरुणांवर उपचार करण्यात आले.