कुरिअरच्या पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याचे सांगून तब्बल 68 लाखांची फसवणूक, कोल्हापुरातील दुसऱ्या घटनेने खळबळ

कुरिअरमधून पाठविलेल्या पार्सलमध्ये मुंबई विमानतळावर अमलीपदार्थ आणि संशयास्पद वस्तू सापडल्या आहेत. त्यामुळे तुमच्या बँक खात्यांची पडताळणी करायची असल्याची भीती दाखवून योगेंद्र रघुनाथ ठाकूर (वय 53, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) यांना 68 लाख 55 हजार 554 रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा प्रकार 22 ते 29 जूनदरम्यान घडला आहे. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी काल रात्री उशिरा पाच संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या महिनाभरापूर्वी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीत घाडगे यांच्या पत्नी नवोदिका घाडगे यांना अशाप्रकारे 20 लाखांचा गंडा घालण्यात आला होता. असा प्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी त्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला होता. तरीसुद्धा पुन्हा एकदा असा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेंद्र ठाकूर हे नाशिक येथे औषध कंपनीत विक्री प्रतिनिधी म्हणून काम करीत होते. दोन वर्षांपूर्वी ते कोल्हापुरात आले. 22 जूनला दुपारी त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअप कॉल आला. मुंबई विमानतळावरून सायबर क्राईम ब्रँचचे अधिकारी अनिल गुप्ता बोलत असून, ‘तुम्ही पाठविलेल्या कुरिअर पार्सलमध्ये 200 ग्रॅम एमडी ड्रग्ज, पासपोर्ट, क्रेडिट कार्ड, लॅपटॉप आणि 35 हजार रुपयांची रोकड सापडली आहे. याबद्दल तुमच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक होऊ शकते,’ असे सांगून त्याने पुढे सायबर क्राईम ब्रँचचे अधिकारी विक्रमसिंग, याच शाखेतील पोलीस उपायुक्त आणि आयुक्त नितीन पाटील, आरबीआयचे फायनान्सियल डिपार्टमेंट हेड जॉर्ज मॅथ्यू या नावाच्या व्यक्तींशी बोलणे घडवले.

या सर्वांनी ठाकूर यांना कारवाईची भीती घालून त्यांच्या आणि आई, वडिलांच्या बँक खात्यांची माहिती घेतली. खात्यांमधील पैशांची पडताळणी करण्यासाठी त्यांनी एका बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले. भीतीपोटी ठाकूर यांनी 68 लाख 55 हजार 554 रुपये ऑनलाइन वर्ग केले. त्यानंतर संशयितांचे मोबाईल नंबर बंद झाले. पैसे परत आपल्या खात्यात जमा होतील, असे समजून त्यांनी महिनाभर वाट पाहिली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या गुह्याचा पुढील तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे.