एकाच्या बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवून त्या बँक खात्यातील 99 हजार 500 रुपयांची रोकड परस्पर वळती करून फसवणूक करणाऱ्या सुरतमधील सायबर गुन्हेगाराला डॉ. डी. बी. मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरण (नाव बदललेले) हे राहतात. 4 तारखेला ते घरी असताना त्यांच्या बँक खात्यातील जवळपास एक लाख रुपयांची रोकड परस्पर अन्य ठिकाणी वळती झाल्याचे त्यांना समजले. कोणीतरी आपल्या पैशांवर डल्ला मारल्याचे त्यांच्या लक्षात येताच किरण यांनी डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि तुकाराम डिगे, उपनिरीक्षक अविनाश आरडक, वैभव गुरव तसेच पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक तपासामध्ये किरण यांच्या बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवून त्यांच्या खात्यातील रोकड परस्पर वळती करणारा भामटा गुजरातच्या सुरत येथे असल्याचे उघड झाले. त्यानुसार पथकाने सुरत गाठून 24 वर्षांच्या सायबर गुन्हेगाराला पकडून आणले. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीने किरण यांच्या बँक खात्याची माहिती कशी मिळवली, याचा पोलीस शोध घेत आहेत.