सायबर कारवाईच्या नावाखाली ठगाने महिलेला भीती दाखवून बँक खात्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला, पण महिलेच्या सतर्कतेने तिची फसवणूक टळली. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठग हे नागरिकांना दिल्ली पोलीस, सीबीआय, ईडी अधिकारी, कोर्टाचे पत्र दाखवून चौकशीच्या नावाखाली बँक खात्यावर डल्ला मारत असल्याच्या घटना घडत आहेत. अशा प्रकरणात सतर्क राहणे गरजेचे असते. ठग बँक खात्यात आलेल्या रक्केमचा तपशील विचारून डल्ला मारतात. अशीच एक घटना दहिसर येथे घडली. दहिसर येथे एक महिला राहते. गेल्या महिन्यात महिलेला एका नंबरवरून फोन आला. तुमच्या फोनची सुविधा बंद होणार आहे, ती चालू ठेवायची असल्यास 1 दाबावे असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून 1 नंबर दाबला. त्यानंतर एकाने महिलेला प्रश्न विचारले. त्याने तो टेलिकॉम ऑथॉरिटीचा कर्मचारी असल्याचे भासवले. सप्टेंबर महिन्यात तुमच्या आधारकार्डवरून एक नंबर घेतला आहे. त्या नंबरवरून 15 जणांना फोन केल्याच्या तक्रारी आल्याचे त्याने भासवले. त्यामुळे फोनची सुविधा बंद होणार असल्याचे तिला सांगितले.
आपण कोणालाही कार्ड दिले नसल्याचे तिने सांगितल्यावर ठगाने पुन्हा प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. हा सायबर गुन्हा असून या केसेस मुंबई क्राईमचे अधिकारी बघतात असे भासवले. तुमची सुविधा बंद होणार नाही त्यासाठी फोन लाईनवरून कनेक्ट राहण्यास सांगितले. ठगाने त्याचे नाव सांगून तो मुंबई क्राईम ब्रँचचा अधिकारी असल्याचे भासवले. त्याने महिलेला आधारकार्ड आणि फोटो पाठवण्यास सांगितले. एका बँक घोटाळय़ात महिलेचे नाव घेऊन तो घोटाळा कोटय़वधी रुपयाचा असल्याचे त्याने सांगितले. चौकशी करायची असल्याचे सांगत ठगाने हे कोणाला सांगू नये; अन्यथा दोन वर्षे तुरुंगात जावे लागेल अशी भीती घातली. काही जणांचे फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवून त्याना ओळखण्यास सांगितले. ठगाने तिला बँक खाती तपासायची असल्याचे सांगून तपशील मागितला. त्यानंतर महिलेने व्हिडीओ कॉलवर कशाला चौकशी करायची, पोलीस कार्यालयात येऊन चौकशी कर असे ठगाला सांगितल्यावर त्याने फोन कट केला. घडल्या प्रकरणी महिलेने दहिसर पोलीस ठाणे गाठले. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.