आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी जय शहा यांची फिल्डिंग, ऑस्ट्रेलिया अन् इंग्लंड बोर्डाचा पाठिंबा

हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) विद्यमान अध्यक्ष जय शहा यांनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. कारण ‘आयसीसी’चे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्पले यांचा कार्यकाळ संपत आहे आणि मंगळवारी (दि. 20) ग्रेग बार्पले यांनी तिसऱ्या कार्यकाळासाठी नकार दर्शवला आहे. त्यामुळे सगळय़ांच्या नजरा आयसीसीचे पुढील अध्यक्ष म्हणून जय शहा यांच्याकडे लागल्या आहेत.

न्यूझीलंडचे ग्रेग बार्पले हे नोव्हेंबर 2020 मध्ये पहिल्यांदा या पदावर निवडून आल्यानंतर 2022 मध्ये पुन्हा एकदा त्यांनी या पदाची सूत्रे स्वीकारली होती. ग्रेग बार्पले लवकरच अध्यक्ष म्हणून चार वर्षे पूर्ण करतील आणि त्यांचा सध्याचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे ‘आयसीसी’च्या अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी सहा दिवसांत ‘आयसीसी’च्या अध्यक्षपदी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने जय शहा यांना किमान तीन वर्षांसाठी ‘आयसीसी’च्या अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला आहे. ग्रेग बार्पले यांनी आपल्या तिसऱ्या कार्यकाळासाठी आयसीसीच्या आगामी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे जय शहा यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.

2015 साली बीसीसीआयमध्ये एण्ट्री

जय शहा यांची 2009 मध्ये क्रिकेट प्रशासनात एण्ट्री झाली होती. त्याआधी ते गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सहसचिवपद सांभाळत होते. त्यानंतर 2015 मध्ये जय शहा ‘बीसीसीआय’मध्ये सहभागी झाले आणि सप्टेंबर 2019 मध्ये मंडळाचे सचिवही झाले

आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष होण्याची संधी

जय शहा वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी सर्वात तरुण ‘आयसीसी’चे अध्यक्ष बनून इतिहास रचू शकतात. जय शहा यांच्या आधी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन. श्रीनिवासन आणि शशांक मनोहर या हिंदुस्थानींनी ‘आयसीसी’चे अध्यक्षपद भूषवले आहे. आयसीसीच्या नवीन नियमांनुसार एखादी व्यक्ती दोनदा अध्यक्ष होऊ शकते आणि प्रत्येक कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. जय शहा आयसीसीचे अध्यक्ष झाल्यास ते या पदावर तीन वर्षे राहतील.