शनिमहाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी, शनिभक्तांनी साधली शेवटच्या शनिवारची पर्वणी

श्रावणमास पर्व समाप्त होत असून, बऱ्याच वर्षांनी श्रावणात आलेल्या पाचव्या आणि अखेरच्या शनिवारी क्षेत्र शनिशिंगणापुरात शनिमहाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली. पहाटे शनी चौथऱ्यावर ओल्या वस्त्राने जाऊन जलाभिषेक करण्यासाठी हजारो भाविकांची झुंबड उडाली. दिवसभरात दोन लाखांहून अधिक भाविकांनी शनिदर्शनाचा लाभ घेतला.

आज पहाटे चार वाजता आरती सोहळा शिवसेना नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे, राहुल भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते संपन्न झाला. पहाटेपासून शनी मंदिराकडे भाविकांच्या गर्दीचा ओघ सुरू होता. परिसरातील पायी येणाऱ्या भक्तांची मोठी गर्दी दिसून आली. वाहनतळापासून महाद्वारापर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या. वाढत्या गर्दीमुळे श्रावण पर्व कालखंडात पहिल्यांदाच पाचवा शनिवार आल्याने शनी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी दिसून आली.

श्रावणी शनिवार असल्याने आसपासच्या हजारो भाविकांनी पहाटे पाच ते सात वेळेत शनिच्या चौथऱ्यावर जाऊन शनिला जलाभिषेक केला. दर्शनात रांगेत महिलांची संख्या लक्षणीय होते. अभिषेक भवनात पूजा -पाट विधी मोठ्या प्रमाणात करण्यात आला. वाढत्या गर्दीमुळे आज शनी मंदिर परिसरातील देवस्थान वाहनतळ व खासगी वाहनतळ फुल्ल झाले होते. पूजा साहित्याच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी दिसून आली. दिवसभरात सुमारे दोन लाखांहून अधिक भाविकांनी शनिदर्शनाचा लाभ घेतला.

20 क्विंटल खिचडीवाटप

श्रावण महिन्यात अन्नदानाला विशेष महत्त्व असल्याने शनी मंदिर परिसरातील अनेक दानशूर भक्तांनी अन्नदान केले. शिवाय येथे येणाऱ्या भाविकांना राहुरीपासून ते घोडेगावपर्यंत रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी भाविकांना साबुदाणा खिचडीवाटप करण्यात आले. त्याचबरोबर पाण्याची बाटली आणि चहावाटप करण्यात आले. मंदिर परिसरात महाप्रसाद, भंडारावाटप करण्यात आले. दिवसभरात अन्नदानाच्या रुपात जवळपास 20 क्विंटल खिचडीवाटप करण्यात आल्याचे अन्नदान करणाऱ्या नागरिकांनी सांगितले.

भुयारी दर्शनपथमुळे गर्दीवर नियंत्रण

शनिशिंगणापुरात आलेल्या भक्तांना सुलभ दर्शन व सोयी-सुविधांसाठी शनेश्वर देवस्थानने पन्नास कोटींहून अधिक खर्च करून पानसतीर्थ प्रकल्प उभारला. भुयारीपथ, घाट, सेल्फी पॉइंट, भव्य दीपमाळ अशा नवीन पद्धतीने बांधलेल्या दर्शनपथमुळे गर्दीवर नियंत्रण मिळाले. शिवाय भाविकांची गर्दी एकाच ठिकाणाहून दर्शनरांगेकडे जात असल्याने भाविकांना दर्शन घेणे सुलभ झाल्याने समाधान व्यक्त केले.