निर्जला एकादशीनिमित्त पंढरपुरात भाविकांची गर्दी; मंदिराचे पुरातन रुपडे बघण्यासाठी भक्तांमध्ये उत्सुकता

निर्जला एकादशीनिमित्त पंढरपूर भाविकांनी गजबजले आहे. निर्जला एकादशीला मंगळवारी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. तसेच रविवार, सोमवार सलग दोन दिवस सुट्टी असल्यामुळे लाखोंच्या संख्येने भाविक पंढरीत दाखल झाले होते. मंगळवारी एकादशीला भाविकांनी पंढरपूर गजबजले होते. चंद्रभागा नदी पात्रात मुबलक पाणी असल्यामुळे भाविकांनी स्नानाचा आनंद लुटला.

निर्जला एकादशीला पंढरीत आलेले भाविक स्नान करण्यासाठी चंद्रभागेत गर्दी करीत होते. स्नानानंतर पदस्पर्श दर्शन तसेच मुखदर्शन व कळस दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. पदस्पर्श दर्शन रांग सारडा भवनच्या दिशेने पुढे पत्राशेडपर्यंत पसरली होती. मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, स्टेशन रोड, प्रदक्षिणा मार्ग, भक्तिमार्ग भाविकांनी फुलून गेला होता. रविवार व सोमवारी सलग दोन दिवस सुट्टी असल्यामुळे राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने पंढरीत दाखल झाले होते. तर मंगळवारी निर्जला एकादशी असल्यामुळे गेले तीन दिवस भाविकांनी पंढरीत गर्दी केली होती. भाविकांच्या वाहनांनी देखील शहरातील वाहनतळ हाऊसफुल्ल झाले होते. त्यामुळे बहूतांश वाहने रस्त्याच्या बाजुला दुतर्फा लावण्यात आली होती. श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन झाल्यानंतर भाविकांनी नगरप्रदक्षिणाही केली. भाविक दर्शनानंतर प्रासादिक साहित्य खरेदीसाठी गर्दी करत होते. यामुळे बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मंदिराचे पुरातन रुप बघण्यासाठी भाविक उत्सुक
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम 15 मार्चपासून सुरु आहे. श्री विठ्ठल व रुक्मिणी गर्भगृह तसेच चार खांबी व सोळखांबी येथील काम पुर्ण झालेले आहे. चार खांबी, सोळखांबावर कोरण्यात आलेली लेणी,अभंगाच्या ओळी स्पष्ट दिसत आहेत. तर विठ्ठल व रुक्मिणीचा मेघडंबरी विना गाभारा पाहणे भाविकांना समाधानी ठरत आहे. मंदिराचे हे पुरातन रुप बघण्यासाठी भाविकांमध्ये उत्सुकता दिसत आहे.