सांगलीतील 20 हजार एकरांवरील पिके पाण्यात; ऊस, भुईमुगसह भाजीपाल्याचे नुकसान

मागील आठवड्यात झालेली अतिवृष्टी आणि धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जिह्यातील कृष्णा आणि वारणा नदीकाठावरील दहा हजार शेतकऱ्यांची 20 हजार एकरांहून अधिक शेती पाण्याखाली गेली आहे. ऊस, सोयाबीन, भुईमूग, भातासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधीचा फटका बसणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने नजरअंदाजे नुकसानीचा अहवाल तयार केला असला तरी पिकांत अद्याप पाणी आहे. त्यामुळे पाणी कमी होऊन पंचनामे कधी होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

यंदा जूनच्या सुरुवातीपासून चांगला पाऊस होत आहे. परंतु, गत आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. कोयना आणि चांदोली धरण क्षेत्रात सलग अतिवृष्टी सुरूच राहिल्याने धरणातून पाणी सोडले. कृष्णा आणि वारणा काठावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिह्यातील 20 हजार एकरांहून अधिक शेती पाण्याखाली गेली आहे. शेतीमधील ऊस, केळी, हळद, सोयाबीन आदी पिकांत पावसाचे पाणी साचून राहिले आहे. याचा शेतकरीवर्गाला फार मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून पिकवलेल्या पिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. सन 2019 आणि 2021 या वर्षात आलेल्या महापुरात जिह्यातील मोठ्या प्रमाणात शेती पाण्याखाली गेली होती.

वारणा नदीकाठच्या शिराळा तालुक्यातील सर्वाधिक पिके पाण्याखाली गेली आहेत. तेथील सुमारे साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा नजरअंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. वाळवा तालुक्यातील सुमारे 700 हेक्टर आणि मिरज तालुक्यातील कृष्णा आणि वारणा काठावरील 650 हेक्टरवरील शेतीपिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक फटका हा ऊस, केळी, हळद आदी पिकांना बसला आहे. सातत्याने महापुराचा तडाखा आणि अतिवृष्टी यामुळे या नदीकाठच्या शेतीपिकांना मोठा फटका बसला आहे.

यंदा शेतकऱ्यांनी आडसाली उसाची लागवण मोठ्या प्रमाणात केली आहे. मात्र, संततधार पावसाचा मोठा फटका या कोवळ्या आडसाली उसाला बसला आहे. अनेक ठिकाणी पुन्हा लागवण करावी लागणार आहे. उसाप्रमाणेच आता या भागातील नदीकाठचा शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात हळद लागवडीकडे वळला आहे. नदीकाठी हळद पावसाच्या पाण्यात बुडाली आहे. भाजीपाला, टोमॅटो, काढता येत नसल्याने उत्पादकाला मोठा फटका बसला आहे. शासनाने या झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्याचे पंचनामे करावेत, तसेच त्याची भरपाई तातडीने देण्याची मागणी होत आहे.