ठाण्यात भाजपच्या चार नगरसेवकांवर गुन्हे; दुकानदाराचा अधिकृत गाळा तोडून जमीनदोस्त केला

रस्ता रुंदीकरणात दुकानाचा गाळा तुटलेल्या दुकानदाराला महापालिकेने दुसरा गाळा उभारण्यासाठी ताबा पत्र देऊनही ठाण्यातील भाजपच्या चार माजी नगरसेवकांनी अक्षरशः थयथयाट केला. या चारही माजी नगरसेवकांनी गाळाधारकाच्या दुकानावर हातोडय़ाचे घाव घालत त्याचा गाळाच तोडूनमोडून जमीनदोस्त केला. याप्रकरणी संजय वाघुले, मृणाल पेंडसे, प्रतिभा मढवी आणि सुनेश जोशी या भाजपच्या चार माजी नगरसेवकांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले.

विजय कृष्णा घाडी (55) यांचा 1984 पासून रेडिमेड गारमेंट विक्रीचा गाळा होता. 2009 मध्ये ठाणे महापालिकेने रस्ता रुंदीकरणात  हा गाळा ताब्यात घेऊन जमीनदोस्त केला. त्यानंतर 2005 च्या प्रस्तावानुसार बाधित झालेल्या गाळेधारकांना गावदेवी भाजी मार्केट येथे जागा देण्यात आली. त्यानुसार विजय घाडी आणि त्यांची पत्नी सुवर्णा घाडी या दोघांनाही पर्यायी गाळा देण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या परवानगीने 29/39 अन्वये 15 जुलै 2024 रोजी ठराव मंजूर केला. महापालिकेने घाडी यांना ताबा पत्रही दिले.

त्यानुसार गावदेवी मैदानाजवळ मार्केटला लागून विजय घाडी यांनी 30 ऑगस्ट रोजी हक्काची टपरी उभारली. मात्र आज भाजपचे माजी नगरसेवक संजय वाघुले, मृणाल पेंडसे, प्रतिभा मढवी आणि सुनेश जोशी गाळय़ासमोर उभे राहून आंदोलन करत असल्याचा फोन घाडी यांना आला. त्यांनी तातडीने त्यांच्या टपरीकडे धाव घेतली, मात्र त्याआधीच या चारही माजी नगरसेवकांनी दोन्ही गाळय़ांवर हातोडय़ाचे घाव घालून तोडफोड केली होती. गाळय़ातील सामान बाहेर इतस्ततः फेकून देण्यात आले होते. ही घटना पाहून घाडी सपशेल हादरले.

पुन्हा दुकान उघडले तर पुन्हा घाव घालू

भाजप नगरसेवक संजय वाघुले यांनी विजय घाडी यांना दमदाटी करत पुन्हा तुझे दुकान उघडलेस तर पुन्हा तोडून टाकीन, अशी धमकी दिली. दरम्यान सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या व्हिडीओत वाघुलेंसह सर्व माजी नगरसेवक हातात हातोडा घेऊन गाळय़ाची तोडफोड करताना दिसल्यानंतर घाडी यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दिली. पोलिसांनी सर्व पुरावे तपासून भाजपचे माजी नगरसेवक संजय वाघुले, मृणाल पेंडसे, प्रतिभा मढवी आणि सुनेश जोशी या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.