पुणे ते मुंबई शिवनेरी प्रवासात 3 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज लांबवला, सहप्रवाशाने दिलेली कॉफी पडली महागात

जाहिरातींची ब्रँडिंग करणाऱया एका व्यावसायिकाला पुणे ते मुंबई हा शिवनेरी बसचा प्रवास भलताच महागात पडला. खालापूर फूड मॉल येथे सहप्रवाशाने दिलेली कॉफी प्यायल्यानंतर तो व्यावसायिक बसमध्ये जाऊन बसला. पण थोडय़ाच वेळाने त्याच्या हाताला इंजेक्शन टोचल्यासारखे झाले. त्यानंतर बेशुद्ध झाले ते तब्बल 80 तासांनंतर ठाण्याच्या ज्युपिटर इस्पितळात त्यांचे डोळे उघडले. यादरम्यान त्यांचा तीन लाख 70 हजार रुपयांचा किमती ऐवज चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

शैलेंद्र साठे (57) असे त्या व्यावसायिकाचे नाव आहे. पुण्यातल्या बाणेर येथे राहणारे शैलेंद्र हे 14 तारखेला मुंबईला येण्यासाठी निघाले. ते वाकड बस स्टॉप येथे शिवनेरी बसमध्ये बसले. दरम्यान एक्प्रेस वेवरील खालापूर फूड मॉल येथे बस थांबली असता सहप्रवाशाने त्यांना कॉफी आणून दिली. ती प्यायल्यानंतर शैलेंद्र बसमध्ये आपल्या जागेवर येऊन बसले. मागोमाग सहप्रवाशीदेखील येऊन बाजूच्या सीटवर बसला. काही वेळाने शैलेंद्र यांच्या उजव्या हाताला इंजेक्शन टोचल्यासारखे झाले. त्यानंतर ते शुद्ध हरपले. त्यानंतर 18 तारखेला ठाण्याच्या ज्युपिटर इस्पितळात शैलेंद्र यांना शुद्ध आली. तेव्हा त्यांच्यासोबत असलेले सोन्याचे दागिने, मोबाईल व बॅग असा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. इस्पितळात उपचार पूर्ण झाल्यानंतर शैलेंद्र यांनी माटुंगा पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

समुद्रात तरुणाने झोकून दिले

मरिन ड्राईव्ह येथील समुद्रात एका बुडत असलेल्या महिलेला पोलिसांनी सुखरूप वाचविल्याची घटना ताजी असतानाच आज संध्याकाळी एका तरुणाने स्वतःला समुद्रात झोकून दिले. त्याचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नव्हता. पोलीस व अग्निशमन दलाचे जवान त्याचा शोध घेत आहेत.

आज संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अंदाजे 40 वर्षांचा तरुण समुद्रकिनारी आला. त्याने सोबत आणलेली सॅकबॅग कठडय़ावर ठेवली आणि तो खाली उतरला आणि तेथे असलेल्या दगडावर झोपला. समुद्र खवळलेला असल्याने उंच लाटा उसळत होत्या. तो दगडावर झोपल्यामुळे समुद्राच्या पाण्याने त्याला आत ओढून घेतले. काही प्रत्यक्षदर्शींनी हे पाहिल्यानंतर त्यांनी लगेच पोलिसांना याबाबत कळविले.

कर्मचाऱयाने मारला बँकेत डल्ला

खराब नोटा पॅकिंग करत असताना बँकेच्या खासगी कर्मचाऱयाने 3 लाख 18 हजार रुपयांची रक्कम चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

तक्रारदार हे बँकेत मॅनेजर पदावर काम करतात. बँकेत जमा होणाऱया खराब नोटा या आरबीआयमध्ये जमा केल्या जातात. गेल्या वर्षी बँकेतून आरबीआयला त्या नोटा जमा झाल्या होत्या. त्या नोटा नंतर आरबीआयने बँकेला मेल करून 3 लाख रुपये कमी असल्याचे सांगितले. त्यामुळे तक्रारदार याने बँकेत सर्व कर्मचाऱयांची चौकशी केली. बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पार्टटाइम स्वच्छतेचे काम करणारा कर्मचारी नोटांची बंडल पॅकिंग करताना दिसला. त्या बंडलामधून तो नोटा चोरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये पैद झाले आहे.