पोलीस बंदोबस्तात अक्षय शिंदे उल्हासनगरच्या स्मशानभूमीत दफन, सहा दिवसांनी अखेर अंत्यसंस्कार

बदलापूरमधील शाळकरी मुलींवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा उल्हासनगरमधील स्मशानभूमीत कडक पोलीस बंदोबस्तात दफनविधी करण्यात आला. अखेर सहा दिवसांनी दफनविधीसाठीच्या जागेचा तिढा सुटला. नातेवाईक आणि पोलिसांच्या उपस्थितीत अखेर रविवारी अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अक्षय शिंदे हा 23 सप्टेंबर रोजी पोलीस चकमकीत ठार झाला होता. यानंतर उत्तरीय तपासणीसाठी अक्षयचा मृतदेह कळवा रुग्णालयात नेण्यात आला. अक्षय शिंदे हा बदलापूरमधील रहिवासी होता. त्यामुळे उत्तरीय तपासणीनंतर मृतदेहावर बदलापूर येथे अंत्यसंस्कार होणे अपेक्षित होते. मात्र अक्षयचा गुन्हा पाहता स्थानिकांनी बदलापूरमधील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास विरोध केला.

यानंतर अक्षयच्या कुटुंबियांनी अंबरनाथमधील स्मशानभूमीत धाव घेतली. मात्र तेथेही स्थानिक नागरिकांनी विरोध केला. न्यायालयाच्या दणक्यानंतर पोलिसांनी उल्हासनगर स्मशानभूमीत अक्षयच्या दफनविधीसाठी जागा निश्चित केली. अखेर रविवारी सायंकाळी पोलीस बंदोबस्तात अक्षय शिंदे दफनविधी करण्यात आला.