राज्यात 7 दिवसांत कोविड रुग्णांची संख्या दुप्पट; महाराष्ट्रात दिवसभरात 70 तर मुंबईत 6 रुग्ण

नववर्षाच्या पहिल्या दिवसाचे स्वागत राज्यासह मुंबईत नागरिकांनी देवदर्शनासाठी रांगा लावून केले असताना कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे खळबळ उडाली आहे. राज्यात गेल्या सात दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. राज्यात आज दिवसभरात 70 कोरोना रुग्ण सापडले असून सक्रिय रुग्णांची संख्या 693 वर पोहोचली आहे तर मुंबईतही रुग्णांची संख्या लक्षणीय असून दिवसभरात 6 रुग्ण सापडले. दरम्यान, कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्य आणि मुंबईतील महापालिकेची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.

नाताळची सलग सुट्टी, त्याला जोडून आलेला वर्षअखेरीचा शनिवार-रविवारमुळे राज्यासह मुंबईकरांनी सार्वजनिक ठिकाणी खरेदीसाठी तसेच विविध ठिकाणी पर्यटनासाठी मोठी गर्दी केली. मात्र, गेल्या 15 पंधरा दिवसांपासून राज्यासह मुंबईत कोरोनाने आता अधिक वेगाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी गेल्या 7 दिवसांत कोरोना दुपटीने पसरला आहे.

42 जणांवर उपचार सुरू
राज्यात कोरोना वाढीचा वेग 2.09 टक्के इतका आहे. आतापर्यंत 693 जण सक्रिय रुग्ण असून त्यातील 42 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी 9 जणांवर आयसीयूमध्ये तर 33 जणांवर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत तर उर्वरित घरी उपचार घेत आहेत. आज दिवसभरात 32 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सुदैवाने आतापर्यंत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.

नगर जिल्ह्यात दोघा शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. तीन दिवसांपूर्वी या विद्यार्थ्यांची सर्दी-खोकला झाल्यामुळे रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली होती. या तपासणीत या विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचे आढळले. दरम्यान, नाशिकमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे तीन रुग्ण सापडले आहेत. यापैकी एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून इतर दोघांवर घरीच उपचार सुरू आहेत.

लेहमध्ये मास्कसक्ती सुरू
लेहमध्ये गेल्या आठवडाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून आजपासून लेहमध्ये घराबाहेर फिरताना सार्वजनिक ठिकाणी मास्कसक्ती बंधनकारक करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या सात दिवसांत लेहमध्ये कोरोनाचे 11 रुग्ण सापडले आहेत.

बुस्टर डोस घेण्याचे पालिकेचे आवाहन
कोराना पुन्हा वेगाने पसरत असला तरी मुंबईकर मात्र बेफिकीर आहेत. कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस 10 जानेवारी 2022 पासून देण्यास सुरुवात केली असताना 94 लाखांवर पात्र लाभार्थ्यांपैकी केवळ 15 ते 16 टक्के जणांनीच बुस्टर डोस घेतला आहे. पालिका, खासगी आणि शासकीय अशा एकूण 94 केंद्रांवर हा बुस्टर डोस मोफत दिला जात आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या धोक्यापासून वाचण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी बुस्टर डोस घ्यावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. दरम्यान, मुंबईत नव्या जेएन.1 व्हेरिएंटचा एकही रुग्ण सापडला नसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

नव्या व्हेरिएंटचा 10 राज्यांत शिरकाव
जेएन.1 या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा देशातल्या 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये शिरकाव केला आहे. देशात आज दिवसभरात 636 रुग्ण सापडल्यामुळे एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजार 394 वर पोहोचली आहे. 636 पैकी जेएन.1 चे या नव्या व्हेरिएंटचे 197 रुग्ण सापडले आहेत. केरळमध्ये कोरोना आणि नव्या व्हेरिएंटचे रुग्ण सर्वाधिक आहेत. आज सापडलेल्या 197 नव्या व्हेरिएंटच्या रुग्णांपैकी केरळमध्ये 83, गोवा 51, गुजरात 34 रुग्ण सापडले आहेत.