नातवाला कुशीत घेण्याची आजोबांची इच्छा पूर्ण, हायकोर्टाच्या दट्टय़ानंतर मुजोर जावई ताळय़ावर

आजोबा-नातवाची ताटातूट करणारा जावई उच्च न्यायालयाच्या दट्टय़ानंतर ताळ्यावर आला. सुनावणीला हजर न राहिल्यास थेट तुरुंगात पाठवू, असा इशारा सुट्टीकालीन खंडपीठाने दिला होता. त्यामुळे हादरलेल्या जावयाने मुलाला दिवसभर आजोबांच्या ताब्यात सोपवले. तसेच न्यायालयात व्यक्तिश: हजेरी लावली आणि मुलाला प्रत्येक महिन्यात दोनदा आजोबांच्या भेटीसाठी मामाच्या घरी सोडणार असल्याची हमी दिली.

नातवाच्या भेटीसाठी आसुसलेले बोरिवलीतील 61 वर्षीय आजोबा जयराज वापीकर यांनी अॅड. रवी प्रकाश जाधव यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी जावई राकेश राठोडविरुद्ध अवमान याचिका दाखल केली. त्यावर न्यायमूर्ती नितीन बोरकर आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे सुनावणी झाली. नियमित खंडपीठाच्या आदेशानुसार जावयाने आपल्या मुलाला आजोबांकडे सोपवले नाही. तसेच न्यायालयात हजर राहण्याचा आदेशही जुमानला नाही. त्यामुळे खंडपीठाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावून तुरुंगात पाठवण्याचा इशारा दिला होता. त्यावर हादरलेल्या जावयाने अटक टाळण्यासाठी न्यायालय गाठले आणि मुलाला प्रत्येक महिन्यात दोनदा मामाच्या घरी सोडणार असल्याची हमी दिली.

– जावयाने दिलेल्या हमीची नोंद घेत न्यायालयाने 3 सप्टेंबर रोजी नियमित खंडपीठासमोर पुढील सुनावणी निश्चित केली. आजोबांची पुन्हा तक्रार आल्यास अवमान कारवाईचा बडगा उगारला जाईल, त्यावेळी कुठलेही कारण ऐकून घेणार नाही, असा तंबी खंडपीठाने जावयाला दिली.