कर्करोगग्रस्त आजोबांना दिलासा, अटी-शर्तींवर घरातील कुलदेवतेचे दर्शन

डोळे बंद होण्याआधी वडिलोपार्जित घरातील कुलदेवतेचे दर्शन घेण्याची 77 वर्षीय आजोबांची इच्छा उच्च न्यायालयाचे दार ठोठावल्याने पूर्ण होणार आहे. यासाठी सासूने केलेली विनंती सुनेने मान्य केली.

सासू-सासरे घरात कधी येतील व कोणत्या वेळेत येतील, पूजेचे साहित्य कोण देईल यासाठी अटींची एक यादी तयार करण्यात आली. यावर सासू व सुनेचे एकमत झाले. सून सध्या परदेशात आहे. सासू-सुनेच्या वकिलांनी या अटींवर स्वाक्षरी केली. न्या. मिलिंद साठये व न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने यावर समाधान व्यक्त केले.

काय आहे प्रकरण

अॅड. स्वप्ना कोदे यांच्यामार्फत सासूने याचिका केली होती. सासू पतीसोबत पेण येथे सध्या नातलगांकडे वास्तव्य करत आहे. त्यांचे तेथून काही अंतरावर हक्काचे घर आहे. हे वडिलोपार्जित घर 90 वर्षे जुने आहे. त्या घरात कुलदेवता आहेत. लहान मुलगा व सून या घरात राहतात. सून सतत वाद घालायची. अखेर तिने आम्हाला घराबाहेर काढले. गेल्या वर्षी पतीला कर्करोगाचे निदान झाले. परिस्थिती बिकट आहे. पतीच्या श्वासाची शाश्वती नाही. अंतिम इच्छा म्हणून घरातील कुलदेवतांचे दर्शन घेऊन त्यांची पूजा करायची आहे. यासाठी सुनेला विनंती केली. तिने घरात प्रवेश नाकारला. पोलिसांना मदतीची विनवणी केली. त्याचा काहीच उपयोग झाला नाही. न्यायालयानेच घरात प्रवेश देण्याचे आदेश सुनेला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

पूजेचे होणार व्हिडीओ शूटिंग

– संपूर्ण पूजेचे व्हिडीओ शूटिंग केले जाईल.
– पूजेचे साहित्य सून देईल.
– घरात काही वैद्यकीय मदत लागल्यास दिली जाईल.
– देव काढून नेता येणार नाहीत.
– 4 जून 2024 रोजी दुपारी 1 वाजता सासू-सासऱयांना घरात येता येईल. सासऱयांच्या प्रकृतीनुसार यामध्ये बदल करता येईल.